31 C
Latur
Saturday, June 22, 2024
Homeसंपादकीय विशेषकौशल्य विकसनाची गरज

कौशल्य विकसनाची गरज

  • गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याकडे कौशल्य विकसनाचा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला आहे. हातात पदव्युत्तर पदवी असूनही, नामांकित विद्यापीठातून शिक्षण घेऊनही बाजाराला आवश्यक असणारे कौशल्य नसल्याने हे उच्चशिक्षित मागे पडताना दिसतात. याउलट कुशल तरुण बेरोजगार राहत नाहीत. ते सहजपणे कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. टेक्निशियन, मिस्त्री, मॅकेनिक, प्लंबर या कारागिरांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम राहते. ही मंडळी सरकारकडे देखील कर भरतात आणि देशाचे अर्थचक्र वेगवान ठेवतात. हे लक्षात घेता नव्या सरकारने पदवी देण्याच्या ठिकाणी कौशल्य विकासाला प्राधान्य देण्याची गरज आहे. संबंधितांना पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने धोरणनिर्मिती करायला हवी.

ध्याच्या काळात शिक्षण आणि कौशल्य विकास यांच्यात ताळमेळ बसताना दिसत नाही. शिक्षणाच्या माध्यमातून मुलामुलींमध्ये कौशल्याचा विकास होणे आवश्यक आहे; मात्र प्रत्यक्षात तसे घडताना दिसत नाही. आपल्या अ‍ॅकॅडेमिक कारखान्यातून डॉक्टर, इंजिनीअर, एमबीए आदी वजनदार पदव्या घेणारे लाखो तरुण बाहेर पडत आहेत. मात्र त्यापैकी बहुतांश तरुण कौशल्यप्राप्त किंवा सर्वसमावेशक ज्ञान नसलेले दिसून येतात. त्यामुळे बरेचदा ही मंडळी कोणत्याही कामाला कौशल्याने तडीस नेऊ शकत नाहीत. याउलट कुशल तरुणांना रोजगाराची टंचाई नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. तंत्रज्ञान आणि व्यावहारिक ज्ञान असणारे मग ते पदवी किंवा इंग्रजीच्या पातळीवर मागे पडलेले का असेनात, प्रत्येक अडचण सहजपणे सोडवू शकतात. कोणतेही काम करण्यासाठी पदवीपेक्षा कौशल्य असणे आवश्यक आहे. शाळा आणि महाविद्यालयाच्या प्राध्यापकांच्या मते, शैक्षणिक वर्षांत जी मुले परीक्षेत सतत अव्वल राहतात, त्यांना हुशार म्हणता येऊ शकते. शाळा आणि महाविद्यालयात चांगले गुण मिळवणारे विद्यार्थी हे अभ्यासात निष्णात असतात आणि याबाबत कोणाचेही दुमत नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की हाच गुणवान असण्याचा अंतिम निकष आहे. कोणत्याही विषयात कमी किंवा अधिक गुण मिळवल्याने एखाद्याला मठ्ठ किंवा दुस-याला हुशार असे म्हणता येणार नाही. प्रत्येक विषयात आवड असणे गरजेचे नाही. महान शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन यांना केवळ भौतिकशास्त्राची आवड होती.

महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईनची कथाही अशीच आहे. लता मंगेशकर यांना गणित आणि विज्ञानाची आवड नव्हती. सचिन तेंडुलकर किंवा महेंद्रसिंह धोनी यांचे अ‍ॅकॅडेमिक रेकॉर्ड बेताचे होते; परंतु ते आपल्या क्षेत्रात दिग्गज बनले. समाजात अशा कुशाग्र व्यक्तींची अनेक उदाहरणे सापडतील. दुसरी बाजू म्हणजे परीक्षेच्या काळात एखादा विद्यार्थी आजारी पडू शकतो किंवा चुकीच्या संगतीमुळे त्याची अभ्यासाची आवड कमी राहू शकते किंवा सुरुवातीच्या काळात त्याची हुशारी दिसणार नाही. परंतु हे विद्यार्थी योग्य वेळी मेहनत करत सतत जागरूक राहणा-या विद्यार्थ्यांच्या तुलनेत परीक्षेत बाजी मारतात. हा फंडा म्हणजे ‘जेव्हा जाग, तेव्हाच पहाट’ प्रमाणे काम करतो. एखाद्या विद्यार्थ्याच्या मनात यश मिळवण्यासाठी ज्योत पेटते तेव्हा तो परीक्षेत दुस-या किंवा तिस-या श्रेणीत उत्तीर्ण होऊनही आयएएसच्या कठीण परीक्षेत आघाडीच्या वीस किंवा ५० व्या स्थानावर दिसतो. नोकरी हेच यशाचे निकष म्हणून गृहित धरले नाही तर काहीतरी वेगळे करून दाखविण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आयुष्यात यशस्वी होणारे अनेक विद्यार्थी दिसतील. ‘

थ्री इडियटस्’मध्ये दाखविलेले प्रसंग नाकारू शकत नाहीत. प्रत्येक मुलगा इंजिनीअर किंवा डॉक्टर व्हावा हे आवश्यक नाही. आपल्या कौशल्याला चालना देणारे आजघडीला असंख्य क्षेत्र उपलब्ध आहेत आणि तुम्ही कोणत्याच मुलाला कमी लेखू शकत नाहीत. हुशार किंवा कौशल्याच्या आघाडीवर कोणाला किती पात्र समजता, हे आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. लोकसेवा आयोगाने २०१३ मध्ये पहिल्यांदा प्रारंभिक आणि मुख्य परीक्षेतील गुण सार्वजनिक केले. यात १००४ विद्यार्थी यशस्वी झाले आणि पहिल्या क्रमांकावर असलेल्या विद्यार्थ्याला ५३ टक्के मिळाले होते. शेवटच्या पायरीवर असलेल्या विद्यार्थ्याने लेखी परीक्षेत ३० टक्के गुण मिळवले होते. पूर्वी यूपीएससी परीक्षेत ७५ ते ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी यशस्वी मानले जायचे. यूपीएससी सोडा अजूनही अनेक सरकारी विभाग उदा. राज्य लोकसेवा आयोग, बँक, रेल्वे, कर्मचारी निवड मंडळ आदी निवड संस्था यशस्वी उमेदवारांचे गुण सार्वजनिक केले जात नाहीत.

एकीकडे दहावी आणि बारावी परीक्षेत विद्यार्थी शंभर टक्के गुण मिळवतात, तर दुसरीकडे यूपीएससीच्या परीक्षेत सामान्य वर्गातील उमेदवार लेखी परीक्षेत केवळ ३० टक्के गुण मिळवत अंतिम यादीत सामील होतो. दहावी आणि बारावीला पैकीच्या पैकी गुण मिळवणारे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत सामील होत नाहीत आणि जे सहभागी होतात, त्यांचे कौशल्य तुलनेने फिके पडताना दिसते. मग दहावी अणि बारावीला पैकीच्या पैकी गुण देणे चुकीचे आहे का? असा प्रश्न विचारला जातो. स्थिती एवढी वाईट आहे की बँक आणि अन्य खासगी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील संस्थेत भरती करण्याच्या उद्देशाने घेण्यात येणा-या परीक्षेत सर्वोच्च स्थान घेणा-या विद्यार्थ्याला शंभर गुण सोडा ६० टक्केदेखील गुण मिळवताना दमछाक होते.

देशात इंजिनीअरिंग, मेडिकल, आयटीआय तसेच कौशल्य विकास अभ्यासक्रमांची गरज बोलून दाखविली जात आहे. मात्र या अभ्यासक्रमातील धडे हे नावापुरतेच आहेत. या ठिकाणी अभ्यास करूनही बहुतांश विद्यार्थी कौशल्यहीन होतात, तर कौशल्यप्राप्त तरुण देशाचा सर्वसमावेशक विकास निश्चित करण्यासाठी नेहमीच पुढे राहतात.कुशल तरुण बेरोजगार राहत नाहीत. ते सहजपणे कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. टेक्निशियन, मिस्त्री, मॅकेनिक, प्लंबर या कारागिरांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम राहते. ही मंडळी सरकारकडे देखील कर भरतात आणि देशाचे अर्थचक्र वेगवान ठेवतात. हे लक्षात घेता नव्या सरकारने पदवी देण्याच्या ठिकाणी कौशल्य विकासाला प्राधान्य देण्याची गरज आहे. संबंधितांना पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने धोरणनिर्मिती करायला हवी. कारण सर्वांचे ज्ञान एकसारखे नसले तरी मेहनत सर्वच जण करू शकतात. या मेहनती वृत्तीला कौशल्य विकसनाची जोड लाभल्यास त्यातून वैयक्तिक आणि राष्ट्रीय परिवर्तन घडू शकते.

– सीए संतोष घारे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR