सेलू : येथील क्रांती चौक ते टिळक पुतळा या चार पदरी रस्त्यावर फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. सदरचा रस्ता हा चार पदरी असून देखील वाहतुकीस अडथळा निर्माण होत असतो. त्यामुळे अपघाताची शक्यता असून या रस्त्यावरील अतिक्रमण ताबडतोब काढण्यात यावे अशी मागणी होत आहे.
सेलू येथील क्रांती चौक ते टिळक पुतळा या मार्गावर सतत फार मोठ्या प्रमाणात वाहतूक व पादचारी यांची वर्दळ असते. मात्र या चार पदरी रस्त्यावर अनेक गाडे धारकांनी अतिक्रमण केले असून सदरचा रस्ता हा पूर्णपणे अतिक्रमणाने व्यापलेला आहे. या रस्त्यावर श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिराला जाणा-या तसेच साईबाबा मंदिर व गणपती मंदिराला जाणा-या भाविकांची विशेषत: महिलांची फार मोठी गर्दी असते.
सायंकाळच्या वेळी या रस्त्यावरून पायी जाणे देखील अवघड झालेले असून वाहनांना जाण्या येण्याकरिता देखील जागा नसते. मात्र अशा परिस्थितीतही या अतिक्रमणधारकांकडे तसेच महिला व लहान मुले यांच्या सुरक्षिततेकडे पाहण्यास दुर्लक्ष होत आहे.
विशेष म्हणजे हा रस्ता सतत वर्दळीचा असून या रस्त्यावर नेहमीच एखादा पोलीस कर्मचारी असणे देखील गरजेचे आहे. मात्र या सर्वच गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे. या अतिक्रमणामुळे एखादा अपघात देखील होऊ शकतो. त्यामुळे सदरचे अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे व अपघातामुळे एखादा जीव गमावल्या जाऊ नये याची तसदी अथवा काळजी नगर परिषदेने घ्यावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.