लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र आणि संपूर्ण देशातील शैक्षणिक केंद्र म्हणून नावारूपाला आलेल्या लातूरमध्ये विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या तरुण वर्गाला क्रीडा क्षेत्रात करिअर घडवता यावे, त्यासाठी त्यांना सराव करता यावा म्हणून येथील जिल्हा क्रीडा संकुलाचा सर्वंकष पुनर्विकास आराखाडा तयार करुन त्याची अंमलबजावणी करावी. पुरेशी जागा उपलब्ध करुन विभागीय क्रीडा संकुलाच्या उभारणीलाही गती द्यावी आदी मागण्या माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. २ एप्रिल रोजी दुपारी क्रीडामंत्री दत्ताजी भरणे यांच्या समवेत मंत्रालयातील त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीदरम्यान केल्या आहेत. सर्व मागण्यांच्या संदर्भाने सकारात्मक प्रतिसाद देऊन त्यावर कार्यवाही करण्याच्या सूचना क्रीडा मंत्रीमहोदयांनी यावेळी संबंधित अधिका-यांनी दिल्या आहेत.
जिल्हा क्रीडा संकुलातील प्रेक्षक गॅलरीची दुरुस्ती करुन त्यावर सोलर सिस्टिमचे कव्हर निर्माण करावे जेणेकरून येथे लागणारी वीज तेथेच निर्माण होईल खेळाडूंना सर्व प्रकारच्या खेळांच्या नियमांची माहिती मिळणे, नामवंत खेळाडूंच्या कौशल्यांची व त्यांच्या कारकिर्दीची माहिती मिळण्याच्या दृष्टीने या क्रीडा संकुलावर स्पोर्ट लायब्ररी आणि ई लायब्ररीची सुविधा निर्माण करण्यात यावी, लातूर जिल्हा क्रीडा संकुलावर सकाळी व संध्याकाळी फिरण्यासाठी येणारे नागरिक आणि खेळाडूंची संख्या मोठी आहे, प्रवेशद्वारात या सर्वांची वाहने उभी राहत असल्याने या परिसरात वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण होते, ही बाब लक्षात घेता त्यांच्या वाहनासाठी स्वतंत्र वाहन तळ आवश्यक आहे. या सुविधेसाठी लगत असलेल्या आयटीआयची जागा उपलब्ध करुन घ्यावी.
लातूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जिल्हा क्रीडा संकुलात नागरिकांना फिरण्यासाठी एकूण तीन ट्रॅक बांधण्यात आले आहेत, यातील दोन ट्रॅक पेव्हर ब्लॉकचे आहेत, या ट्रॅकवर चालल्यामुळे नागरिकांना व खेळाडूंना गुडघेदुखीचा त्रास उद्भवत आहे, ही बाब लक्षात घेता या ठिकाणी एक सिंथेटिक ट्रॅक बनवण्यात यावा. लातूर क्रीडा संकुलावर नियमितपणे तालुका, जिल्हा आणि विभागीय पातळीवरच्या क्रिडा स्पर्धा होत असतात, या स्पर्धेसाठी येणा-या खेळाडू, प्रशिक्षक यांच्या निवासासाठी बांधण्यात आलेले वस्तीगृह आता जीर्ण झाले आहे. त्यामुळे त्याठिकाणी बीओटी तत्त्वावर अद्यावत वस्तीगृह, प्रशिक्षक अधिका-यांसाठी विश्रामगृह आणि या सर्वांसाठी कॅन्टींगची उभारणी करण्यात यावी. क्रिकेट खेळाकडे तरुणांचा असलेला ओढा लक्षात घेऊन कव्हा येते क्रीडा संकुलासाठी उपलब्ध असलेल्या जागेवर अद्यावत क्रिकेट मैदान उभारण्यात यावे, क्रिकेट अकादमी स्थापन करून त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे पीचेस, लॉन, प्रेक्षक गॅलरी वस्तीगृह यासह विविध सोयी सुविधा उभारण्यात याव्यात लातूर येथे मंजूर असलेल्या विभागीय क्रीडा संकुलात सर्व प्रकारातील आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रीडा मैदाने व सोयी सुविधा उभारण्यासाठी मुरुड अकोला येथील वन विभागाची जमीन उपलब्ध करुन घ्यावी.
या व इतर मागण्या तसेच सूचना या बैठकीदरम्यान नोंदवण्यात आल्या. सर्व मागण्या आणि सूचनावर बैठकीदरम्यान संबंधित अधिकारी यांच्यासमवेत विचारविनिमय करण्यात आला, लातूर क्रीडा संकुलाच्या संदर्भाने आलेल्या सर्व प्रस्तावावर चर्चाही झाली, तयार असलेल्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करावी नव्याने आलेल्या सूचनांचे प्रस्ताव तयार करून ते तातडीने मंजूर करून घ्यावेत त्याच्यावर अंमलबजावणी करावी अशा सूचना क्रीडामंत्री दत्ताजी भरणे यांनी याववेळी संबंधित अधिका-यांना दिल्या आहेत. लातूर येथील क्रीडा क्षेत्राचा विकास करण्यासाठी नोंदविण्यात आलेल्या विविध मागण्यावर एकत्रित स्वतंत्र बैठक बोलावून सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल क्रीडामंत्री दत्ताजी भरणे यांचे यावेळी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आभार मानले.