26.1 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeमहाराष्ट्रखंबाटकी घाटात मालवाहू ट्रकने घेतला पेट

खंबाटकी घाटात मालवाहू ट्रकने घेतला पेट

खंडाळा : प्रतिनिधी
पुणे-बंगळुरू महामार्गावरील खंबाटकी घाटात आयशर मालट्रकला शॉर्ट सर्किटने अचानक आग लागून सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तर या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, चालक सकील आलम (वय २३) हा आयशर मालट्रक प्रदर्शनात असणा-या स्टॉलचे साहित्य घेऊन मुंबईहून बंगळुरूकडे निघाले होते.

अशियाई महामार्गावरील खंबाटकी घाटातून मार्गक्रमण करत असताना त्या मालट्रकच्या केबिनमध्ये अचानक शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचे समजताच चालक सकील आलम आणि साहित्याचा मालक अमनकुमार बाहेर पडले. यावेळी त्यांनी अग्निरोधक यंत्राच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र वा-यामुळे आगीचा भडका उडाला आणि वाहनासह साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.

घटनेचे वृत्त समजताच खंडाळ्याचे पोलिस उपनिरीक्षक संतोष मस्के, महामार्गाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बाळासाहेब वंजारे आपल्या सहका-यांसह दाखल झाले. त्यानंतर अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. यावेळी एशियन पेंटस् व वाई नगर परिषदेचे अग्निशामक बंबांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. दरम्यानच्या कालावधीत खंडाळ्याच्या दिशेला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास जळित वाहन बाजूला घेत असताना पुन्हा काहीवेळ खंबाटकी घाटात वाहतूक धिम्या गतीने सुरू होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR