वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
खगोलशास्त्रज्ञांनी सुमारे ३० लाख प्रकाशवर्षे दूर असलेल्या सूक्ष्म आकाशगंगांचा संग्रह शोधला आहे, ज्यामध्ये आतापर्यंत पाहिलेली सर्वात लहान आणि अस्पष्ट आकाशगंगा समाविष्ट आहे. ही आकाशगंगा अँड्रोमेडा ‘एक्सएक्सएक्सव्ही’ म्हणून ओळखली जाते आणि तिच्या अन्य सहकारी आकाशगंगा आपल्या शेजारील अँड्रोमेडा आकाशगंगेभोवती परिभ्रमण करत आहेत. हा शोध ब्रह्मांडाच्या उत्क्रांतीबद्दल आपल्या समजुतीत मोठा बदल घडवू शकतो.
एवढ्याशा लहान आकाशगंगा सुरुवातीच्या ब्रह्मांडातील उष्ण आणि घन स्थितीत टिकून राहू शकत नव्हत्या. तरीही, ही आकाशगंगा नष्ट न होता कशी टिकली, हा मोठा प्रश्न आहे. मिशिगन विद्यापीठाचे प्राध्यापक आणि संशोधन पथकातील सदस्य एरिक बेल म्हणतात, ‘ही पूर्णपणे कार्यक्षम आकाशगंगा आहे, पण ती आपल्या मिल्की वे आकाशगंगेपेक्षा सुमारे दशलक्ष पट लहान आहे. जणू एखादा परिपूर्ण मनुष्य तांदळाच्या कण्याएवढ्या आकाराचा आहे!’ बटू आकाशगंगा ही संकल्पना वैज्ञानिकांसाठी नवीन नाही. आपल्या मिल्की वे आकाशगंगेभोवती अशा अनेक लहान उपगंगा आहेत.
तथापि, बटू आकाशगंगा अत्यंत अस्पष्ट आणि लहान असल्याने त्यांचा शोध घेणे आणि त्यांचा अभ्यास करणे कठीण आहे. आपल्या ‘मिल्की वे’ नावाच्या आकाशगंगेभोवती असलेल्या बटू आकाशगंगांची माहिती आपण आतापर्यंत घेतली होती, मात्र इतर आकाशगंगांच्या भोवती अशा लहान आकाशगंगांचा शोध घेणे कठीण होते.
‘मिल्की वे’च्या सर्वात जवळच्या प्रमुख आकाशगंगेच्या, अँड्रोमेडाच्या, भोवतीही काही बटू आकाशगंगा पूर्वी सापडल्या आहेत, पण त्या तुलनेने मोठ्या आणि प्रकाशमान होत्या. त्यामुळे खगोलशास्त्रज्ञांनी आतापर्यंत मिळवलेली माहिती फक्त मिल्की वे भोवती असलेल्या बटू आकाशगंगांवर आधारित होती. नवीन शोधलेले अँड्रोमेडा आणि त्याच्या सहकारी सूक्ष्म आकाशगंगा ब्रह्मांडाच्या सुरुवातीच्या काळातील परिस्थिती आणि आकाशगंगेच्या निर्मिती प्रक्रियेवर नवा प्रकाश टाकू शकतात.