महापुरुषांच्या नंतर सगळीकडेच त्या महापुरुषाच्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा जयघोष केला जातो. त्या व्यक्तीला आपले आदर्श मानले जाते. त्याच अनुषंगाने काही लोक भावनिक होऊन ‘परत या, परत या, महाराज तुम्ही परत या!’ अशा घोषणा देतात आणि भावनिक होऊन लोक त्याला दुजोराही देतात. परंतु केवळ भावनेने पोट भरत नसते हे ही तेवढेच खरे. काही गोष्टी केवळ बोलण्यासाठीच असतात, त्यापैकी ही एक गोष्ट! अशी आव्हाने करून महापुरुष परत येत नसतात, आणि कल्पना करा, खरंच आज छत्रपती शिवाजी महाराज परत आले तर काय होईल? अनेक जिकिरीचे प्रसंग देशासमोर उभे राहतील.
आपण गृहीत धरू की, साधारणत: पंचवीस वर्षांचे तरुण वयातील छत्रपती शिवाजी महाराज जर आज अचानक आपल्यामध्ये प्रकट झाले तर काय काय होईल आणि कुणाकुणावर काय परिणाम होतील? ही मोठी मजेशीर गोष्ट असेल! महाराज आल्याबरोबर तत्कालीन काळासारखे आपले सवंगडी, सोबती शोधतील! त्यांनी उभारलेले पुणे शहर त्यांना कुठेच दिसणार नाही. स्वत:च्या जयंतीचे सगळीकडे पोस्टर्स पाहून त्यांना कसंतरीच वाटेल! भोवताली उभा असणारा तरुण पाहून महाराजांना एकावर एक आश्चर्याचे धक्के बसतील! काही क्षण थांबले न थांबले की; लगेच महाराजांच्या भोवती लोकांचा एकच घोळका जमा होईल! सगळेजण लगेच महाराजांसोबत तरुण-तरुणी-स्त्रिया-पुरुष सेल्फी काढायची घाई करतील! प्रचंड ढकलाढकली पाहून ‘हे काय चालले आहे?’ याचा महाराजांना काहीच अंदाज येणार नाही. सगळीकडे गर्दीच गर्दी! तत्काळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहील. सगळीकडे पोलिस आणि प्रशासनाची धावाधाव! अनेक भ्रष्ट, लाचखोर अधिका-यांना ‘आपण महाराजांसमोर कसे जावे(?) असा यक्षप्रश्न पडेल. फोटो आणि सेल्फीच्या नादात महाराजांना कुणी आंघोळ-निवास-भोजन आदी बाबतीत विचारेल का? तेवढ्यात एखादा गरीब माणूस येऊन महाराजांना आपल्या घरी घेऊन जाईल. महाराज पाहून त्याला मनोमन आनंद होईल.
‘बोल बोलता वाटे सोपे’ या तुकोक्तीप्रमाणे महाराजांची व्यवस्था आपल्याकडून होईल का? महाराज छत्रपती आहेत! त्यांना आल्याबरोबर आपल्याला त्यांचा हुद्दा बहाल करावा लागेल! हे सगळेच मोठे आव्हानात्मक असेल. महाराज जिथेही जातील आणि तरुणांना भेटतील त्यावेळी तरुणांना काही प्रश्न विचारतील. किती तरुण महाराजांना सामोरे जातील? तात्पुरत्या सजावटीत अडकलेल्या तरुणांना आपल्या मोबाईलपासून सुटका मिळेल का? मोबाईल सोडून तरुण महाराजांच्या सोबत जातील का? त्यानंतर महाराज आपले स्वराज्य शोधण्याचा प्रयत्न करतील. भोवतालच्या दहापाच लोकांना आपल्या राज्याची अवस्था विचारतील. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या अनुरूप मान-सन्मानाचे पद कोण देईल? सर्वच राजकारणी लोक मोठ्या गोंधळात पडतील. इथे महाराष्ट्रात ज्याचा त्याला पक्ष, सत्ता, घराणेशाही, प्रतिष्ठा, संपत्ती वाचवायचे पडले आहे. सगळीकडे सत्तासोपान हस्तगत करण्याची जीवघेणी स्पर्धा सुरू आहे! इथे नेमका कोण कोणत्या पक्षाचा निष्ठावंत आहे? कोण कोणत्या पक्षात आहे? असे एक ना अनेक प्रश्न त्या त्या राजकारणी लोकांसमोर पडलेले असताना प्रत्यक्ष शिवराय समोर बघून सगळी परिस्थिती कठीण होऊन जाईल! सगळेच पक्ष आपापले अस्तित्व टिकवण्याचा आटापिटा करत असताना अचानक छत्रपती शिवाजी महाराज आलेले पाहून त्यांच्यासमोर अनंत प्रश्न निर्माण होतील. काय करावे आणि काय नाही? असा प्रश्न निर्माण होईल! सर्वच राजकीय पक्षांच्या पोस्टरवर आपला स्वत:चा फोटो प्रथम छापलेला पाहून त्यांना एकावर एक आश्चर्याचे धक्के बसायला लागतील!
आल्याबरोबर महाराज कुठे जातील? हे सगळे पाहून महाराजांना आपल्या स्थापन केलेल्या रयतेच्या राज्याची आजच्या एकूण अवस्थेची तुलना करून पाहताना वर्तमान परिस्थितीची किळस येईल! अशी बजबजपुरी पाहून महाराज प्रचंड व्यथित होतील! त्यामुळे कुणा राजकीय किंवा अधिकारी व्यक्तीकडे न जाता महाराज सरळ सामान्य रयतेमध्ये जातील. गोरगरिबांच्या झोपडीत राहणे महाराज पसंद करतील! तिथे सामान्य लोक प्रचंड गर्दी करतील. लोकांची प्रचंड गर्दी पाहून महाराज अचंबित होतील. अनंत समस्या घेऊन लोक महाराजांसमोर उभे असतील. पीडित, शोषित, गरीब स्त्रिया-पुरुष आपली कैफियत महाराजांकडे मांडतील. महाराज भावनिक होतील. आपल्या अष्टप्रधान मंडळाला आदेश देण्याच्या आवेशात असताना त्यांच्या लक्षात येईल की; इथली बेगडी, खोटारडी लोकशाही मूठभर धनदांडग्या चोरांच्या दावणीला बांधली असून हे चोरच साव असल्याचा आव आणून दिवसाढवळ्या लोकशाहीचे लचके तोडत आहेत.
सामान्य रयतेमधून उठून महाराज ताडताड विधान भवनाकडे निघतील! भव्य विधानभवन पाहून महाराजांना आनंद होईल! पण ते विधानभवन महाराजांना पाहून ढसाढसा रडायला लागेल! विधानभवन महाराजांना, ‘महाराज, इथे सामान्य माणसांचे प्रश्न केवळ चर्चिले जातात, मात्र त्यावर अंमलबजावणी होत नाही. शेतक-यांच्या मालाच्या भावाची केवळ फोलपट चर्चा होते, मात्र शेतकरी मालाला भाव काही मिळत नाही!’ अशी व्यथा कथन करेल. करोडोंची उलाढाल होणारे मंत्रालय हे भ्रष्टाचाराचे कुरण झालेले पाहून महाराज मनातून व्यथित होतील! मंत्रालयाच्या पायरीवर बसून महाराज ढसाढसा रडतील! ‘मी रयतेचे राज्य निर्माण केले होते! जात-पात-धर्म-पंथ-लिंग याचा भेद कधीच केला नाही! शेतकरी सुखी केला. स्त्रीची अब्रू शिरसावंद्य मानली. आई-वडिलांची आजीवन सेवा केली. अठरापगड जातीतील निष्ठावंत, शूरवीर, जिवाला जीव देणारी माणसं उभी केली! असे असताना लोकशाहीत ही धनदांडग्यांची लोकशाहीयुक्त हुकूमशाही कशी काय उभी राहिली?’ हे पाहून महाराज ताड्कन उठतील आणि पुन्हा आपले स्वराज्य निर्माण करण्याची प्रतिज्ञा करतील!
– प्रा. डॉ. विठ्ठल खंडुजी जायभाये
मोबा. ९१५८० ६४०६८