पुणे : प्रतिनिधी
राज्यात काही ठिकाणी पाऊस सक्रिय झाला असला, तरी जुलै महिना पूर्ण कोरडा गेल्याने त्याचा परिणाम खरिपातील पिकांवर झाला आहे. अनेक ठिकाणी पुरेसा पाऊस नसल्याने पिके अखेरची घटका मोजत आहेत. ढगाळ वातावरणामुळे उसाचे पीक वाढत नसल्याची स्थिती आहे. राज्यातील ३५८ तालुक्यांपैकी २२५ तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला असून, १३० तालुक्यांत १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाल्याची नोंद आहे.
यंदा १०६ टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात मे महिन्याच्या अखेरीस नैऋत्य मोसमी वारे दाखल होऊन पावसाला सुरुवात झाली. दहा दिवस आधीच मान्सून दाखल झाल्याने मे महिन्याच्या अखेरीस आणि जूनमध्ये राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातील अनेक धरणे भरल्याने मोठ्या प्रमाणात विसर्गही झाला. मात्र, पेरणीनंतर पुरेसा पाऊस नसल्याने खरिपाच्या पिकांना फटका बसला आहे. विसर्ग केलेल्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने त्याचाही परिणाम खरीप पिकांवर झाला आहे.
मे आणि जूनमधील पावसामुळे शेतक-यांनी पेरण्या केल्या. मात्र, त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग, खान्देश, मराठवाडा व विदर्भात पुरेसा पाऊस न झाल्याने त्याचा परिणाम पेरण्यांवर झाला आहे. पाऊस नसल्याने ही पिके जळण्याच्या स्थितीत आहेत. राज्यातील काही तालुक्यांत कमी पाऊस असल्याने पिके अडचणीत आली आहेत. शेतक-यांनी सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास पिके तग धरून राहतील, असे कृषी विभागातील वैभव तांबे यांनी सांगितले.
राज्यात ९५ टक्के पेरण्या
राज्यात सरासरीच्या १४४ लाख ३६ हजार हेक्टरपैकी १३७ लाख ३४ हजार हेक्टर म्हणजेच ९५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. मागील वर्षी याच काळात १४५ लाख ८२ हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या होत्या. राज्यात दोन महिन्यांत सरासरीच्या ५३८.५ मिलिमीटरपैकी ४९७.८ मिलिमीटर म्हणजेच ९२ टक्के पाऊस झाला आहे. १२ जिल्ह्यांत १०० टक्क्यांहून अधिक पाऊस पडला आहे. २२ जिल्ह्यांत १०० टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग, मराठवाडा, खान्देश, पश्चिम विदर्भात कमी पाऊस पडला आहे.