लातूर : प्रतिनिधी
खरीप हंगामाच्या तोंडावर लातूर जिल्ह्यात डीएपी खताचा तुटवडा जाणवत असून सोयाबीनच्या मागणी असलेल्या बियाण्यांचीही बाजारात वानवा आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून यावर शासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी शासनाकडे केली आहे.
बुधवार दि. २१ मे रोजी मुंबई येथे माजी आमदार धिरज देशमुख यांनी राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी खरीप हंगामाच्या अनुषंगाने शेतक-याची अडचण व जिल्ह्यातील विविध विकासकामांसंदर्भात सविस्तर चर्चा केली. लातूर जिल्ह्यात खरीप पेरण्या तोंडावर आल्या असतानाच, डीएपी खताची उपलब्धता कमी झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. जिल्ह्यातील बहुतांश कृषी सेवा केंद्रांमध्ये डीएपी खत मिळत नसल्याने शेतक-यांना मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. तसेच शेतक-यांची मागणी असलेल्या सोयाबीनचे वाण ३३५ आणि एमएयूएस ७१ हे बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध नाहीत. महाबीजसह इतर कंपन्यांच्या या मागणी असलेल्या बियाण्यांसाठी शेतक-यांना अक्षरश: वणवण करावी लागत आहे. पेरणीसाठी योग्य वेळी बियाणे न मिळाल्यास पीक उत्पादनावर थेट परिणाम होईल, अशी भीती शेतक-यांकडून व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील शेतक-यांच्या मागणीची दखल घेऊन डीएपी खते आणि सोयाबीनचे महाबीज व इतर मागणी असलेल्या बियाण्यांचा पुरेसा पुरवठा जिल्ह्यात उपलब्ध करावा, अशी मागणी देशमुख यांनी कृषी मंत्री यांच्याकडे केली. शेतक-यांना वेळेवर आणि योग्य दरात बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागाने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी विनंतीही कृषीमंत्री महोदयांकडे पत्राद्वारे त्यांनी केली व यासंदर्भात सहकार मंत्री महोदयांनी देखील प्रयत्न करावेत, अशी विनंती केली आहे.
लातूर जिल्हा बँकेचे चेअरमन व माजी आमदार धिरज देशमुख यांनी सहकारमंत्री व लातूर जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन जिल्हा बँकेच्या विविध योजनांसंबंधी देखील यावेळी सविस्तर चर्चा केली. यावेळी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन अॅड. प्रमोद जाधव, बॅकेचे संचालक अशोक गोविंदपूरकर, पृथ्वीराज सिरसाट यांची उपस्थिती होती.