शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख
ग्रामीण भागात खरीप हंगाम पेरणीपुर्व मशागतीला सुरुवात झाली आहे.पेरणीच्या अगोदर शेतातील कामे आटोपण्याकडे शेतकरी वळले असून रखरखत्या उन्हात रूमण्यावर हात ठेवून बळीराजा पाळी मारण्यात व्यस्त आहे. मात्र सतत सततच्या अवकाळी ने शेतकरी त्रस्त झाले असून या पावसाने शेतजमीनीची धुप झाली नसल्याने शेतक-यातूनचिंता व्यक्त केली जात आहे. शेतीचे यांत्रिकरण व बैलबारदान्याचा अभाव असल्याने शेतीची नांगरणी ट्रक्टरद्वारे केली असली तरी त्यानंतर शेतीची मशागत बैलाच्या साह्याने करण्यात येत आहे.त्यात अनेक शेतकरी उन्हाळी हंगामातील पिके काढण्यासाठी तयारी करत असून शेती सपाटीकरण, बांध दुरूस्ती,गावराण खत टाकणे अशा कामात शेतकरी व्यस्त आहेत. अशात उन्हात जमीनीची धुप होणे आवश्यक असताना गेल्या महिन्याभरापासून अवकाळी पाऊस पडत असून यामुळे जमीनीत कस निर्माण होण्यास अडथळा येत असल्याने यंदा पिकेल नाही, अशीचिंता शेतक-यांना सतावत आहे.
दरम्यान मृग नक्षत्र नंतरच ख-या अर्थाने खरीप हंगामातील पेरण्यांना सुरुवात होते. पाऊस पडल्याबरोबर शेतकरी चाढ्यावर मुठ धरुन पेरणी करतात.मात्र त्या अगोदर पेरणीची वेळ येईपर्यंत शेतक-यांंना उन्हाळाभर शेतात अनेक मशागती कराव्या लागतात. त्यात रब्बी हंगामानंतर उन्हाळ्यात नांगरणी, शेण खत टाकणे बरोबरच नांगरणीत निघालेले ढेखळे फोडण्यासाठी मोगडा मारावा लागतो.सध्या तापमान ४० अंशावर असून सुर्याच्या किरणाने अंगाची काहिली होत आहे. तरी देखील या जीवघेण्या उन्हात उद्याच्या चांगल्या पिकांचे स्वप्न घेवून शेतकरी खरीप पेरणीपुर्व कामात व्यस्त असल्याचे सगळीकडे चित्र दिसत आहे.