बुलडाणा : प्रतिनिधी
खामगाव ते शेगाव रोडवर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून २४ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी सहा प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना जयपूर लांडे फाट्यासमोर घडली आहे. पुणे इथून परतवाडा इथे जाणा-या एसटी बसला मागून चार चाकी वाहनाने आधी धडक दिली, त्यानंतर खासगी ट्रॅव्हल्सने या दोन्ही वाहनांना उडवले. सकाळी पाच वाजता झालेल्या या तिहेरी अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव-शेगाव रोडवर आज पहाटे पाचच्या सुमारास भीषण तिहेरी अपघात झाला. जयपूर लांडे फाट्यासमोर घडलेल्या या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला, तर २४ जण जखमी झाले आहेत. यापैकी ६ जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर स्थानिक शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, पुण्याहून परतवाड्याकडे जाणा-या एसटी बसला एका भरधाव बोलेरो कारने समोरून धडक दिली. ही बोलेरो कार शेगावकडून कोल्हापूरच्या दिशेने जात होती. या धडकेनंतर लगेचच मागून येणा-या एका खासगी प्रवासी बसने या दोन्ही वाहनांना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भयानक होता की, बोलेरोचा पूर्ण चुराडा झाला, तर एसटी आणि खासगी बसचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मृतांचा आकडा वाढण्याची भीती
अपघातस्थळी चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. खासगी बसच्या पुढील भागात अडकलेल्या चालकाला मोठ्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आले. या अपघातामुळे परिसरात तणावाचे वातावरण असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.