जळकोट : प्रतिनिधी
सन २०१६ या वर्षी रेल्वे अर्थसंकल्पामध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी लातूर रोड -जळकोट-मुखेड-बोधन हा १३४ किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग मंजूर केला. यामुळे जळकोट शहरासह तालुक्यात आनंदाचे वातावरण होते परंतु रेल्वे मार्ग मंजूर झाल्यानंतर ज्या पद्धतीने पाठपुरावा व्हायला पाहिजे होता तो न झाल्यामुळे आठ वर्षानंतरही जमिनीचे संपादनहि होऊ शकले नाही. गतवर्षी या रेल्वे मागच्या अंतीम सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली होती. या रेल्वे मार्गाचे अंतिम सर्वेक्षणही पूर्ण झाले आहे. या रेल्वे मार्गाचे काम लवकर सुरू व्हावे यासाठी लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे हे सरसावले आहेत.
या महत्वपूर्ण अशा रेल्वेमार्गासाठी देशाचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन या रेल्वे मार्गाच्या उर्वरित कामास गती द्यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे. लातूर रोड ते बोधन हा रेल्वे मार्ग निजाम कालीन आहे. इंग्रजांसाठी हा अतिशय महत्त्वाचा असा रेल्वे मार्ग होता. आंध्र प्रदेशमधील रामागुंडम ते मुंबई या महत्वपूर्ण शहरांना जोडण्यासाठी हा रेल्वे मार्ग महत्त्वाचा होता .त्याकाळी इंग्रजांनी या रेल्वे मार्गाला मंजुरी दिली होती. या काळामध्ये मुंबईपासून कुरूडवाडीपर्यंत तर रामागुंडमपासून बोधनपर्यंत रेल्वे लाईन झाली. पुढे मात्र या रेल्वे मार्गाचे काम थांबले. यानंतर लोकनेते राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नामुळे कुरूडवाडी ते लातूर रोड इथपर्यंत रेल्वे मार्ग होऊ शकला. आंध्रप्रदेशामधून बोधनपासून पुढे मात्र राजकीय अनस्थेमुळे हा मार्ग होऊ शकला नाही.
जळकोट ते बोधन हा रेल्वे मार्ग मंजूर होऊन आठ वर्षांचा कालावधी झाला परंतु या कालावधीमध्ये कुठलीही प्रगती होऊ शकली नव्हती परंतु आता अंतिम सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. आता जमीन संपादन तसेच यासाठी निधी केंद्र सरकारकडून मंजूर करणे तसेच प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या कामास सुरुवात होणे बाकी आहे.