22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeलातूरखिसे कापणा-यास स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड 

खिसे कापणा-यास स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड 

लातूर : प्रतिनिधी
गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांच्या खिशातील, पर्समधील मोबाईल, पैसे चोरणा-या एकास स्थानिक गुन्हे शाखेकडून गजाआड करण्यात आले असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे ५ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. पोलिस ठाणे निलंगा येथील एक पर्स चोरीचा एक गुन्हाही उघडकीस आला आहे तर चोरीच्या कामात हातभार लावणारी त्याची पत्नी मात्र फरार झाली आहे.
पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये घडणा-या चोरी व मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात पोलिस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करण्यात आले होते. सदर पथकामार्फत जिल्ह्यातील विविध गुन्हेगारांची माहिती एकत्र करून त्याचे विश्लेषण करण्यात येत होते तसेच गोपनीय बातमीदार नेमून त्यांच्याकडून माहिती घेण्यात येत होती.
दरम्यान दि. १० रोजी पोलिस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून चोरीचे मोबाईल कमी किमतीत विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला मध्यवर्ती बस स्थानक परिसरातून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव अजीम गौस शेख, वय २५ वर्षे, रा. मदनीनगर, लेबर कॉलनीजवळ, लातूर सध्या रा. खाडगाव रोड, लातूर असे असल्याचे सांगितले, नमूद आरोपीला ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्याने सांगितले की, तो व त्याची पत्नी असे दोघे मिळून बस स्थानक, रेल्वे स्थानक येथे चढ-उतार करीत असताना गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांच्या पर्समध्ये, खिशामध्ये ठेवलेले पैसे व मोबाईल चोरीचे गुन्हे केल्याचे कबूल केले तसेच सदरचे मोबाईल कमी किमतीत लोकांना विकत असल्याचे सांगितले.
त्यावरून लातूर जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांच्या अभिलेखाची माहिती घेतली असता पोलिस ठाणे निलंगा येथे पर्स व त्यामध्ये ठेवलेली २ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम व एक मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे दिसून आले. नमूद आरोपीने त्याच्या पत्नीसह मिळून गुन्ह्यात चोरलेला एक मोबाईल व इतर बस स्थानक, रेल्वे स्थानकातून चोरलेले ४ मोबाईल असे एकूण  ५ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. नमूद आरोपीला ताब्यात घेताच त्याची पत्नी फरार झाली असून तिचा शोध घेण्यात येत आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अमलदार रियाज सौदागर, मोहन सुरवसे, राजेश कंचे, पोलिस ठाणे शिवाजीनगरचे पोलिस अंमलदार युवराज गिरी, पोलिस ठाणे एमआयडीसीचे सहायक फौजदार बेल्लाळे, पोलिस अंमलदार अर्जुन राजपूत, पोलिस ठाणे रेणापूरचे मुन्ना मदने, महिला पोलिस अंमलदार मेघा देवमाने यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR