33.5 C
Latur
Tuesday, March 18, 2025
Homeमहाराष्ट्रखोक्या भोसलेचा पोलिस कोठडीत अन्नत्याग

खोक्या भोसलेचा पोलिस कोठडीत अन्नत्याग

बीड : अर्धनग्न करून मारहाण करण्यासह इतर गंभीर गुन्हे दाखल असलेल्या भाजपचे आ. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेला कुख्यात गुंड सतीश ऊर्फ खोक्या भोसले याने शिरूरच्या पोलिस निरीक्षकांना सोमवारी अर्ज केला. यात त्याने आपले घर जाळणा-यांसह अ‍ॅट्रॉसिटी व पोक्सोच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. खोक्या हा २० मार्चपर्यंत पोलिस कोठडीत आहे.

खोक्याने बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला अर्धनग्न करून मारहाण केली तसेच शिरूर तालुक्यातील बावी येथील ढाकणे पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला केला. गांजाही जवळ बाळगला. अनेक प्राण्यांची शिकार करून त्यांचे मांस घरात ठेवले. या सर्व प्रकरणात खोक्याविरोधात चकलांबा आणि शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. खोक्या हा सहा दिवस फरार होता. बीड पोलिसांनी त्याला प्रयागराजमधून अटक केली होती. त्याला न्यायालयाने २० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ती संपण्याआधीच खोक्याने सोमवारी शिरूर पोलिसांकडे अर्ज करून न्याय देण्याची मागणी करत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

सुरेश धसांकडून पाठराखण
भाजपचे आ. सुरेश धस यांनी खोक्या हा आपलाच कार्यकर्ता असल्याची कबुली दिली होती. वनविभागाने आपल्या जागेत अतिक्रमण केल्याने त्याचे घर पाडले. त्यानंतर भाजपचे आ. सुरेश धस यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच याबाबत घाई केल्याचेही त्यांनी म्हटले. तर ढाकणे कुटुंबाचीही आ. धस यांनी भेट घेतली. खोक्यासारख्या कुख्यात गुंडाची आ. धस पाठराखण का करत आहेत? असा सवाल उपस्थित होत आहे. या आगोदर ओबीसीचे नेते प्रा. टी. पी. मुंडे यांनीही खोक्या हा हरणाचे मांस आ. धस यांना पुरवत असल्याचा आरोप केला होता.

घर जाळणा-यांची दिली नावे
राधाबाई भाऊसाहेब भोसले यांनीही पोलिसांना अर्ज केला आहे. यात त्यांनी घर जाळणा-यांची नावे दिली आहेत. त्यांना आरोपी करावे, अशी मागणी केली आहे. दोन दिवसांपूर्वी तक्रार देताना आपण जखमी होते. त्यामुळे नावे आठवली नाहीत, असे त्यांनी अर्जात म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR