लातूर : प्रतिनिधी
गंजगोलाई परिसरातील ७० फुट रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचे न्यायालयाचे आदेश असताना लातूर शहर महानगरपालिकेने दंडेलशाही करीत संपूर्ण गंजगोलाई व्यवसायमुक्त करुन न्यायालयाचा अवमान केला आहे. तसेच मस्जिद रोड हॉकर्स झोन असल्यामुळे याच रोडवर व्यवसाय करण्यावरही पथविक्रेते ठाम असल्याचे स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषद अध्यक्ष मोहसीन खान यांनी हॉकर्सच्या बैठकीत सांगीतले.
गेल्या अनेक दिवसांपासून लातूर शहरातील हातगाडे, पथविक्रेते आणि शेतक-यांच्या व्यवसायावर महापालिकेने धडक कार्यवाही करुन यांच्यावर उपासमारीची वेळ आणली आहे. गंजगोलाई आणि दयानंद कॉलेज गेटसमोरील व्यावसायिकांना तेथेच व्यवसाय करण्याची संधी द्यावी व इतर मागण्यांचे विविध आंदोलन करून स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने निवेदने देण्यात आली परंतु यावर कसलाच प्रतिसाद महापालिका देत नसून उलट थेट कार्यवाही करत आहे.
या अनुषंगाने गोलाईतील व दयानंद कॉलेज गेटसमोरील पथविक्रेते, हॉकर्स आणि शेतक-यांची बैठक झाली. त्याप्रसंगी मोहसीन खान बोलत होते. बैठकीस माजी नगरसेवक अहेमदखान पठाण, विक्रांत शंके, फ्रुट असोसिएशनचे जाकेर बागवान, रईस टाके, बाबा शेख, इलाही शेख, शादूल शेख उपस्थित होते.