लातूर : प्रतिनिधी
गंज गोलाईतील भाजीपालपा, फळ विक्रेत्यांसह इतर छोट्या-छोट्या व्यवसायिकांना मस्जिद रोड व साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे रोडवर न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत व्यवसाय करु द्यावा, या मागणीसाठी तसेच लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाच्या चुकीच्या धोरणाच्या निषेधार्थ गंज गोलाईतील भाजीपाला, फळ विक्रेते, फेरीवाल्यांनी दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजल्यापासून गंज गोलाईत आंदोलन सुरु केले होते. भाजीपाला, फळे रस्त्यावर फेकुण फेरीवाल्यांनी आपला रोष व्यक्त केला. सायंकाळी ६ वाजता आंदोलन थांबविण्यात आले. दरम्यान मनपा प्रशासन व फेरीवाल्यांच्या बैठकांचे सत्र रात्री उशिरापर्यंत सुरुच होते.
गंज गोलाईतील भाजीपाला, फळ विक्रेते व फेरीवाल्यांना गंज गोलाईतून हटविण्याची मोहिम लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने गेल्या २० दिवसांपासून सुरु आहे. त्यामुळे फेरीवाल्यांनी मस्जिद रोडवर आपला व्यवसाय सुरु केला होता. आता मनपा प्रशासनाने तेथूनही फेरीवाल्यांना हटविण्याची मोहिम तिव्र केल्याने फेरीवाल्यांतून रोष व्यक्त केला जात आहे. मस्जिद रोड हॉकर्स झोन असल्यामुळे या रोडवर व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी फेरीवाल्यांची आहे. मात्र मनपा प्रशासन त्यांची मागणी मानण्यास तयार नाही. यातून शनिवारी फेरीवाल्यांनी तीव्र संताप व्यक्त करीत रस्त्यावर भाजीपाला, फळे, कांदे, बटाटे फेकुन ठिय्या आंदोलन केले. दरम्यान महानगरपालिका प्रशासनाने फेरीवाल्यांना साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चौक ते राजर्षी शाहू महाराज चौक या रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथची पर्यायी जागा घोषीत केली. परंतू, फेरीवाल्यांनी तशी लेखी मागताच मनपा प्रशासनाने लेखी देण्यास नकार दिला.
शिवाय फु्रट मार्केटच्या पाठीमागील मोकळी जागाही पर्यायी जागा म्हणून निश्चित केली परंतू, ऐनवेळी दुसरीच जागा मनपा प्रशासनाकडून दाखविण्यात आल्याचा आरोप यावेळी फेरीवाल्यांकडून करण्यात
आला. महानगरपालिका प्रशासनाने फेरीवाल्यांसाठी आठवडी बाजार म्हणुन काही जागा निश्चित केल्या आहेत.; परंतू, त्या जागा फेरीवाल्यांना मान्य नाहीत. भाजीपाला, फळे विक्रीचा व्यवसाय हा गर्दीच्या ठिकाणी, बाजारपेठेतच असतो. पर्यायी जागा म्हणुन मनपा प्रशासन दुर कुठेतरी जागा देणार असेल तर ते फेरीवाल्यांना तसेच ग्राहकांसाठीही त्रासदायक आहे, अशी तक्रार करण्यात येत आहे. मनपा आयुक्तांनी जागेवर येऊन आमच्याशी चर्चा करावी, मार्ग काढावा, तोडगा काढावा, अशी फेरीवाल्यांची मागणी आहे.