नवी दिल्ली : केंद्र सरकारने आज तिस-या कार्यकाळातील दुसरा पूर्ण अर्थसंकल्प मांडला आहे. या अर्थसंकल्पातून सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. रुग्णांसाठीही केंद्र सरकारने आपले हात मोकळे करत गंभीर आजारावरील ३६ औषधे ड्युटी फ्रि केली आहेत. त्यामुळे ही औषधे स्वस्तात मिळणार आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपला आठवा अर्थसंकल्प मांडताना रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. सीतारामन यांनी ३६ जीवन रक्षक औषधांचा ड्युटी टॅक्स पूर्णपणे रद्द केला आहे. सर्व सरकारी रुग्णालयात कॅन्सर डे केअर सेंटर बनवण्याचा निर्णयही केंद्र सरकारने घेतला आहे. कॅन्सरवरील उपचारासाठीची औषधे आता स्वस्त होणार आहे. सहा जीवन रक्षक औषधांवरील कस्टम ड्युटी ५ टक्के करण्यात आली आहे.
मेडिकल कॉलेजच्या जागा वाढवणार
निर्मला सीतारामन यांनी मेडिकल कॉलेजात अतिरिक्त जागा उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा केली आहे. ५ वर्षात १० हजार मेडिकलच्या जागा वाढवण्यात येणार आहेत. आयआयटीमध्ये ६५०० सीटें वाढवण्यात येणार आहेत आणि ३ एआय सेंटर उघडण्यात येणार आहेत. एआय शिक्षणासाठी ५०० कोटीचा बजेट ठेवण्यात आला आहे.