मुंबई : प्रतिनिधी
महिलांच्या केसांमध्ये, वेणीत फुले किंवा गजरा माळणे आपल्याकडे खूपच कॉमन आहे. पण हाच गजरा तुम्हाला अडचणीत आणू शकतो. हे आम्ही नव्हे, तर एक लोकप्रिय अभिनेत्रीचे म्हणणे आहे, कारण एका गज-यामुळे ती नुकतीच मोठ्या अडचणीच सापडली आणि त्या साठी तिला १ लाख २५ हजार रुपयांची दंडाची रक्कम भरावी लागली.
मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमधील विख्यात अभिनेत्री नव्या नायरला एक अजब आणि तितक्याच धक्कादायक प्रसंगाचा सामना करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे मल्याळी समुदायाने आयोजित केलेल्या ओणम समारंभात सहभागी होण्यासाठी ती गेली, मात्र तिथे गेल्यावर तिच्यासोबत असं काही घडलं, ज्याची तिने कधी स्वप्नानतही कल्पना केली नव्हती.
मेलबर्न आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्याला त्रास सहन करावा लागला कारण तिच्या हँडबॅगमध्ये चमेलीची फुले असल्याने ऑस्ट्रेलियन सीमा सुरक्षा दलाने तिला थांबवले. १५ सेमी लांबीचा छोटासा चमेलीचा गजरा नेल्याबद्दल तिला १९८० ऑस्ट्रेलियन डॉलर्स (अंदाजे १.२५ लाख रुपये) चा मोठा दंड भरावा लागला.
ओणम सेलिब्रेशनदरम्यान, तिने मंचावरून स्वत:च ही घटना शेअर केली. नव्याने सांगितले की तिच्या वडिलांनी कोची विमानतळावरून तिच्यासाठी हा गजरा खरेदी केला होता. त्यांनी तो गजरा दोन तुकड्यांमध्ये विभागला होता. त्या गज-याचा एक भाग नव्याने कोचीहून सिंगापूरला जाणा-या विमान प्रवासादरम्यान केसांत माळला होता,मात्र सिंगापूरला पोहोचेपर्यंत तो गजरा, फुले कोमेजली होती. म्हणून तिने गज-याचा दुसरा भाग कॅरी बॅगमध्ये पॅक करून तिच्या पर्समध्ये ठेवून दिला. सिंगापूरला पोहोचल्यावर ती तो गजरा घालणार होती. पण ऑस्ट्रेलियातला अशा प्रकारे फुले घेऊन जाणे हे कायद्याच्या विरोधात आहे हे नव्याला माहीत नव्हतं. त्यामुळ विमानतळावरील अधिका-यांनी तिची बॅग तपासली तेव्हा चमेलीची फुले पाहून त्यांनी तिला थांबवले आणि लगेच दंड ठोठावला.