शिरुर अनंतपाळ : शकिल देशमुख
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील गणेशवाडी ग्रामपंचायत ईमारतीचे छत कमकुवत झाले आहे. अशात छताच्या आतील स्लॅबचे तुकडे गळून खाली पडत असल्याने या ग्रामपंचायतीच्या ईमारतीत कार्यालयीन कामे करणे अवघड झाले असून पूर्ण ईमारतच धोकादायक बनल्याने ती कधी कोसळेल याचा काही नेम नसल्याने प्रतिनिधी व कर्मचारी यांनी कार्यालय चक्क बंद ठेवले आहे. तर सध्या ग्रामपंचायतीचा कारभार व कार्यालयीन कामे चक्क उघड्यावर बसून करावे लागत आहेत.
तालुक्यातील गणेशवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयाची ही ईमारत फार जुनी असून, सद्य:स्थितीत ती मोडकळीस आली आहे. ही जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधण्यात यावी,अन्यथा जिल्हा परिषद लातूर येथे आंदोलन करण्यात येईल असे ग्रामसभेत ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामसेवक, गावातील ग्रामस्थांनी सांगितले आहे.
दरम्यान सध्या इमारतीचा गिलावा, छत सतत गळून पडत आहे, भिंतींना भेगा पडल्या आहेत.त्यात मागील पावसाळ्यात पावसाचे पाणी झिरपून ग्रामपंचायतीत येत असल्याने महत्वाची कागदपत्रे भिजली आहेत. आता स्लॅबचे तुकडे पडत असल्यामुळे या इमारतीमध्ये बसून कामकाज करणे धोक्याचे बनले आहे. त्यामुळे इमारतीच्या बाहेर मोकळ्या जागेत खुर्ची टेबल टाकून ग्रामपंचायतचा कारभार केला जा असून ग्रामपंचायतचे दप्तर कोठे ठेवायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने ही इमारत पाडून नवीन इमारत ग्रामपंचायत च्या खुल्या जागेत बांधणे आवश्यक आहे.