लातूर : प्रतिनिधी
गतीमान प्रशासनासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर येथेच महसूल आयुक्तालय घोषित करावे, अशी आग्रही मागणी कृती समितीने केली आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर येथे येत आहेत. विकासरत्न विलासराव देशमुख आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी मराठवाड्याच्या विकासाला चालना दिली. निजाम राजवटीपासून मराठवाड्यात महसूल विभागाचे प्रमुख कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथेच आहे.
पुर्वी केवळ ५ जिल्हे होते. आता जिल्ह्यांची संख्या ८ झाली असून तालुक्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे म्हणून विद्यमान आयुक्त कार्यालयावर कार्याचा प्रचंड बोजा पडलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची अडचण होते, अशा परिस्थितीत गतिमान प्रशासनासाठी, जनतेच्या सोयीसाठी, मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि गुणवत्तेवर लातूर येथेच स्वतंत्र विभागीय महसूल आयुक्त कार्यालय स्थापन झाले पाहिजे ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून विशेषत: लातूर, धाराशिव आणि बीड या जिल्ह्यातून केली जाते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल आयुक्त कार्यालय स्थापनेसाठी दांगट समितीची स्थापनासुद्धा केली. या समितीने शासनास दिलेला अहवाल हा लातूर येथे मराठवाड्यातील दुसरे स्वतंत्र विभागीय महसूल आयुक्त कार्यालय स्थापनेसाठी सकारात्मक आहे, अशा परिस्थितीत मुख्यमंत्री यांनी गतिमान प्रशासनासाठी लातूर येथे आयुक्तालय स्थापनेची घोषणा करावी, लातूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी म्हणजेच खासदार, मंत्री महोदय आणि आमदार यानी मुख्यमंत्री महोदयांकडे आग्रह धरावा, असे पत्रक लातूर विभागीय महसूल आयुक्त कार्यालय निर्माण कृती समितीच्या वतीने अॅड. व्यंकट बेद्रे, अॅड. भाई उदय गवारे, माजी आमदार वैजनाथ शिंदे, माजी आमदार त्र्यंबक भिसे, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, अॅड. अण्णाराव पाटील, अॅड. बळवंत जाधव, अशोक गोविंदपूरकर, शिवाजी नरहरे, मोईज शेख, अॅड. प्रदीप मोरे, मोहन माने, अॅड. समद पटेल, अॅड. वसंत उगले, बसवंत भरडे, संजय मोरे, चंद्रकांत चिकटे, आनंत लांडगे, देविदास काळे, सुहास पाचपुते, अॅड. शेखर हवीले, अॅड. शाहरुख पटेल, अॅड. सुशील सोमवंशी, अख्तर मिस्त्री, सुरेश पवार, चंद्रकांत चिकटे, सुपर्ण जगताप, कॉ. विश्वंभर भोसले आदींनी प्रसिद्धीस दिले आहे.