आग्रा : वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशात ‘गद्दार’वरून वाद पेटला आहे. राज्यसभेमध्ये राणा संगा यांना गद्दार म्हणणारे सपा खासदार रामजी लाल सुमन यांच्या आग्रा येथील घरावर करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. बुलडोझरसह १००० हून अधिक कार्यकर्ते खासदारांच्या निवासस्थानी पोहोचले. मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि दगडफेक केली. या चकमकीत अनेक पोलीसांची डोकी फुटली आहेत.
करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी खासदारांच्या घराबाहेर ठेवलेल्या ४० ते ५० खुर्च्या फोडल्या. मुख्य गेट तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांनी खासदारांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या १० हून अधिक वाहनांची तोडफोड केली. घटनास्थळापासून १ किमी अंतरावर सीएम योगींचा कार्यक्रम सुरू होता.
करणी सेनेच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ थांबवण्यासाठी सपाचे कार्यकर्तेही खासदारांच्या घरी पोहोचले. करणी सेनेच्या कार्यकर्त्यांशी हाणामारी झाली. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. मात्र, तरीही परिस्थिती नियंत्रणात येऊ शकली नाही. सुरक्षेच्या दृष्टीने सपा खासदारांच्या सोसायटीचे दोन्ही दरवाजे बंद करण्यात आले. कोणीही घराबाहेर पडणार नाही, अशा स्पष्ट सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.
राज्यसभेत सपा खासदार काय म्हणाले?
सपा खासदार रामजीलाल सुमन यांनी म्हटले की, मुस्लिमांकडे बाबरचा डीएनए आहे, मग हिंदूंमध्ये कोणाचा डीएनए आहे? बाबरला कोणी आणले? बाबरला राणा संगाने भारतात इब्राहिम लोदीचा पराभव करण्यासाठी आणले होते. जर मुस्लीम बाबरची मुले असाल तर तुम्ही (हिंदू) गद्दार राणा सांगाची मुले आहात. याचा निर्णय भारतात व्हायला हवा. राणा सांगा नव्हे तर बाबर यांच्यावर टीका केली जाते. भारतीय मुस्लिम बाबरला आपला आदर्श मानत नाहीत. मोहम्मद साहेब आणि सुफी परंपरेला ते आपले आदर्श मानतात.