अमरावती : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांनी आक्रमकपणे सत्ताधा-यांवर टीका करण्यास सुरुवात केली. खासदार अमोल कोल्हे म्हणाले, शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रुग्णालयात दाखल असताना पाठीत खंजीर खुपसण्यात आला. केवळ महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी शिवसेना फोडण्यात आली. पाठीत असा खंजीर खुपसणा-यांना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही. ते अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे मंगळवारी रात्री मोर्शी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार गिरीश कराळे यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत बोलत होते.
खासदार अमोल कोल्हे म्हणाले, चाळीस आमदारांना सुरत, गुवाहाटी, गोवा तसेच ‘काय झाडी काय डोंगार’ महाराष्ट्र आजही विसरलेला नाही. झाडी, डोंगर, हॉटेल ही मजा मारली जात असताना महाराष्ट्राचा स्वाभिमान चिरडला जात होता. हेदेखील महाराष्ट्र विसरलेला नाही. या गद्दारीसाठी त्यांना पंधरा खोके मिळाले. आज सत्ता टिकेल की नाही ही भीती वाटायला लागल्यामुळे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांत ओके केले जात आहे. ही वस्तुस्थिती महाराष्ट्राला कळली आहे. यामुळेच आता महाराष्ट्राने महाविकास आघाडीचे सरकार आणायचे ठरवले आहे.
एखाद्याच्या घराचे छप्पर काढून घ्यायचे. मग त्याला अंथरूण-पांघरूण द्यायचे. वरून म्हणायचे बघ आम्ही तुला मदत केली, असा प्रकार खरेतर राज्यातील सरकार करत आहे. दिवाळीत आमच्या बहिणींनी चकल्या, चिवडा आणि शंकरपाळे केले असतील. मात्र खोब-याचा दर सुमारे दीडशे रुपयांनी वाढवला. तेलाचे भाव वाढवलेत, याकडे या माय-माऊलींचे लक्ष गेले नाही.
महाराष्ट्राच्या उज्ज्वल परंपरेला काळिमा
पुढे अमोल कोल्हे म्हणाले, गेल्या दोन-अडीच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल करण्यात आला. महाराष्ट्राच्या राजकारणाची थट्टा करण्यात आली. सुसंस्कृत म्हटल्या जाणा-या महाराष्ट्राच्या राजकारणाला उज्ज्वल परंपरा होती. या परंपरेला काळिमा फासण्यात आला. याविषयी स्वाभिमानी आणि प्रत्येक मराठी माणसाच्या मनात राग आहे.
मतांची कडकी म्हणून बहीण लाडकी
माणूस गेला तर त्याच्या तिरडीवर अंथरायला लागणा-या कापडावरसुद्धा जीएसटी वसूल केला जातो. मतांची पडली कडकी म्हणून या सरकारला झाली बहीण लाडकी अशी टीकादेखील खासदार अमोल कोल्हे यांनी सरकारच्या योजनांवर केली.