लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील प्रभाग ४ हा काँग्रेसचा बाले किल्ला होता, यापुढे ही राहणार आहे. या प्रभागातून आपण निवडणून दिलेल्या नगरसेवकांनी आपल्याशी व काँग्रेस पक्षाशी गद्दारी केली आहे. या पुढे अशा ‘गद्दारोसे यारी नही… और यारोसे गद्दारी नही’ हे लक्षात ठेवा व आपल्या मतातून त्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन लातूर ग्रामीणचे माजी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांनी केले.
शहरातील प्रभाग क्र. ४ मधील काँग्रेस-वंचित बहूजन आघाडीचे उमेदवार सचिन गायकवाड, गोरीबी बागवान, कौसर शेख, अहेमदखॉ पठाण यांच्या प्रचारार्थ दि. १२ जानेवारी रोजी इस्मालपुरामध्ये आयोजित सभेत माजी आमदार धिरज देशमुख बोलत होते. या सभेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय सांळुके, रेणा सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष अॅड. प्रविण पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, सत्तार शेख, अहेमद सरवर, डॉ. खालेद सिध्दकी, युनूस शेख, करीमलाला, सुरेश गायकवाड, मोईन पठाण, हमीदभाई शेख, मोईनखान, मोईन हाश्मी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना माजी आमदार धिरज देशमुख म्हणाले की, परवा लातूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कच्या मैदानावर राज्याच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या जाहीर सभा झाल्या सभेतून त्यांनी आदरणिय विलासराव देशमुख यांच्या कार्याचे कौतूक करत जणू त्यांचे काम बघा अन् हाताच बटन दाबा, असा संदेशच दिला आहे. या प्रभागातील पुर्वीचे नगरसेवक हे हाताच्या चिन्हावर निवडून आले होते. त्यांना काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या माध्यमातून विकास कामासाठी निधी मिळाला होता. या प्रभागात १३८ विकास कामे झाली आहेत. ती काँग्रसेच्या नेतृत्वान दिली होती. हे विसरुन चालणार नाही. प्रत्येकाच्या न्यायहक्कासाठी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी लढणार असून आम्ही मुळ विचार व तत्वाशी कधीही तडजोड करणार नाही,
आपले लातूर पुर्वी आजच्या धाराशिव जिल्ह्यातील तालुका होता आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांच्या पुढे लातूर जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव ठेवला व त्यानी तो मंजूर केला हे ही आपणाला विसरुन चालणार नाही. लातूर जिल्हा झाल्यापासून लातूरने देशभरात सुसंस्कृत शहर म्हणून ओळख निर्माण केली. या शहरात कधी दंगा झाला नाही. पण काही जण जातीय तेढ निर्माण करून लातूरला बिघडवण्याचे काम करीत आहेत.
जाती-जातीत तेढ निर्माण करून पैशाच्या जोरावर सत्ता मिळवणारे आपल्याकडे दुर्लक्ष करतील, हे पुढच्या पिढीसाठी धाकादायक आहे. पैशाच्या जोरावर मते मागणारे तुमचयाकडे येतील त्यांना सांगा लातूर चांगल्या कामासाठी ओळखले जाते, आम्ही विकणार नाही. जे आपल्या मतावर निवडून आले ते आपल्याला विसरले ते आपली काय आठवण ठेवणार आहेत. अशांना धडा शिकवण्याची संधी आपल्याला दि. १५ जानेवारी रोजी मतदान रुपातून आली आहे.
या प्रभागातील काँगेस व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा व प्रभाग क्र. ४ हा पुर्वी पासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला होता व या पुढे ही राहणार हे दाखवून द्या. तसेच जिल्ह्यातील विरोधी पाच आमदारांनी वेगवेगळ्या प्रभागाची जबाबदारी घेतली आहे. आपल्या मताच्या ताकदीतून काँग्रेसच्या विजयाचा षटकार मारून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवावा, असे आवाहन केले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, अॅड. प्रविण पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी काँग्रेस व वंचितचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

