लातूर : प्रतिनिधी
थंडी आता पूर्णपणे ओसरली असून उन्हाच्या झळा हळूहळू सगळीकडे चांगल्याच जाणवू लागल्या आहेत. मागील पंघरा दिवसापासून उन्हाचा पारा चढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे गरिबाचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणा-या मातीचे माठ बाजारपेठेत दाखल झाले आहेत. या माठांची मागणी वाढत आहे. कुंभार व्यवसायिकांच्या वर्षभर केलेल्या अपार कष्टानंतर बनविण्यात आलेल्या माठांना उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर मागणी असते. शहरातील जुने गुळ मार्केट चौकात ग्रामीण भागासह शहरातील कुंभार बांधवांकडून माठ विक्रीसाठी दुकाने थाटली आहे.
उन्हाच्या झळा वाढू लागल्यात्यामुळे नागरिकांना आता थंड पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे. दरवर्षीप्रमाणे गरिबांचा फ्रिज म्हणून संबोधल्या जाणा-या माठाचे बाजारात आगमन झाले आहे. मात्र, माठासाठी लागणा-या कच्च्या मालाच्या किमतीत काही प्रमाणात वाढ झाल्याने यंदा माठाचे दरात १० टक्क्यांची वाढ झाल्याचे शुभंम कुंभार यांनी सागीतले. गतवर्षाच्या तूलनेत यंदा मोठांची किंमत ४०० ते ५०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. शहरातील गुळ मार्केट भागात लहान-मोठ्या आकारातील लाल, काळ्या रंगाचे माठ, रांजण आणि नळ लावलेले माठ विक्रीसाठी दाखल झाले आहेत. त्यातच उन्हाचा कडाका वाढल्याने माठांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असून, नागरिकांतून चांगली मागणी आहे. होळीनंतर माठांची मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होते.
तसेच, माठाच्या बाजारात तेजी येईल असा माठ व्यावसायिकांकडून अंदाज व्यक्त केला जात आहे. कुंभार व्यावसायिक वर्षभर मेहनत घेऊन माठ बनविण्यासाठी मग्न असतात. उन्हाळ्याच्या प्रारंभी माठ बाजारात दाखल होतात. थंडगार पाण्यासाठी महागडा फ्रीज घेणे गरिबांना आवाक्याबाहेर असल्याने मातीच्या माठांना फ्रीज मानून तहान भागवितात. मातीच्या माठात अनेक गुणधर्म असतात. त्यामुळेही मोठ्या प्रमाणात मागणी असते. शहरातील काही भागात माठ विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली असल्याचे दिसत आहे.
बदलत्या काळानुसार थंडगार पाण्याचे मठाची जागा विविध प्रकारच्या साधनांनी घेतली. त्यामुळे काही प्रमाणात परिणाम झालेला आहे. माठातील शुद्ध पाणी आरोग्याला चांगले ठरते. दोन-तीन वर्षांपासून लाल चिनी मातीच्या रंगीबेरंगी माठांना घेण्याचा नागरिकांची पसंदी वाढली आहे. गतवर्षाच्या तूलनेत यंदा लाल माठांना नागरीक अधिक पसंदी देत असल्याचे शुभम कुंभार यांनी सागीतले.