21.3 C
Latur
Thursday, November 14, 2024
Homeमहाराष्ट्रगरोदर महिलेला घेऊन जाणा-या अ‍ॅम्ब्युलन्सचा स्फोट; वाहनाच्या चिंधड्या

गरोदर महिलेला घेऊन जाणा-या अ‍ॅम्ब्युलन्सचा स्फोट; वाहनाच्या चिंधड्या

जळगाव : प्रतिनिधी
धरणगाव येथून गरोदर महिलेला घेऊन येणा-या १०८ या अ‍ॅम्ब्युलन्समधील ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात वाहनाच्या चिंधड्या होऊन त्याचे अवशेष दीडशे फूट उंच उडाले. तर तब्बल ५०० मीटर अंतरापर्यंत या स्फोटाचे हादरे बसले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणगाव येथून एम.एच.१४ सी.एल.०७९६ ही १०८ अ‍ॅम्ब्युलन्स गरोदर महिलेला घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात येत असताना महामार्गावरील गुजराल पेट्रोल पंपाच्या उड्डाणपुलाजवळ गियर बदल करीत असताना आगीची ठिणगी उडाली.

चालकाच्या समयसूचकतेमुळे अ‍ॅम्ब्युलन्समधील रुग्ण, त्याचे नातेवाईक, डॉक्टरचे प्राण वाचले आहेत. अग्निशमन दलाच्या दोन बंबाद्वारे आग विझविण्यात आली. ही घटना बुधवारी रात्री ९:१५ ते ९:३० वाजेच्या दरम्यान महामार्गावरील गुजराल पेट्रोल पंपाच्या पुलावर घडली.

स्फोट व आगीचे दृश्य इतके भयंकर होते की बघणा-यांचाही थरकाप उडत होता. आवाजामुळे निमखेडी शिवारापर्यंत भूकंपासारखे धक्के बसले. यामुळे झोपलेले वृध्द लोकही जागे झाले.
घटना घडली तेव्हा माजी नगरसेवक अमर जैन घरात जेवणाला बसले होते. आवाज ऐकून त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले तर आगीच्या मोठ्या ज्वाला दिसत होत्या. जेवण सोडून त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सर्वांत आधी चालक राहुल बाविस्कर याला लांब नेत अग्निशमन दल व पोलिसांना कळविले. दोन्ही यंत्रणा अवघ्या काही मिनिटांतच दाखल झाल्या. दोन बंबाद्वारे आग विझविण्यात आली. चालकामुळे अ‍ॅम्ब्युलन्समधील रुग्ण वाचले तर अमर जैन यांच्यामुळे चालक सुरक्षित राहिला. जैन व पोलिसांनी वाहतूक वळविली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR