जालना : प्रतिनिधी
जालन्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. प्रेम प्रकरणाच्या संशयावरून जन्मदात्यानेच आपल्या पोटच्या लेकीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर आत्महत्या केल्याचा बनाव रचण्यात आला. एखाद्या चित्रपटातील घटनेप्रमाणेच जालन्यात ही भयंकर घटना घडली. दावलवाडीमध्ये ५ सप्टेंबर रोजी मुलीचा बापाने गळा दाबून खून केला. त्यानंतर आत्महत्येचा बनाव केल्याचे पोलिस तपासात समोर आल आहे.
मुलीच्या प्रेमसंबंधामुळे समाजात अपमान होईल, या भीतीने वडिलांनी स्वत:च्या मुलीचा गळा दाबून खून केल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली. आरोपी वडील हरी बाबुराव जोगदंड याला पोलिसांनी तात्काळ अटक केली असून बदनापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोस्टमार्टम अहवालात देखील गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
आत्महत्या केल्याचा बनाव रचण्यासाठी मुलीला दोरीने गळफास लावून लोखंडी अँगलला लटकविण्यात आले. ही घटना ५ सप्टेंबर रोजी घडली. पोलीस उपनिरीक्षक संतोष कुकलारे हे गस्तीवर असताना त्यांना दावलवाडी येथे एका मुलीने गळफास घेतल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचल्यावर आत्महत्येऐवजी घातपात झाल्याचा संशय निर्माण झाला.