बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नारळी सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमासाठी गहिनीनाथ गडावर आले होते. पंकजा मुंडे आणि सुरेश धस एकाच मंचावर उपस्थित होते. फडणवीसांनी गडाला दत्तक घेण्याऐवजी, गडानेच आपल्याला दत्तक घ्यावे, असे म्हटले. बीडला हक्काचे पाणी देणार असल्याचेही यावेळी त्यांनी म्हटले.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नारळी सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमासाठी शिरूरच्या गहिनीनाथ गडावर पोहोचले.
या नारळी सप्ताहाच्या निमित्ताने मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस हे एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गहिनीनाथ गडाने मला दत्तक घ्यावे. बीड जिल्ह्याचे आणि आमचे नाते वेगळे आहे. ताई आणि महाराजांनी मला सांगितले की, तुम्ही गहिनीनाथ गडाला दत्तक घ्या..पण माझे म्हणणे आहे की, गडाने मला दत्तक घ्यावे. ताई आणि विठ्ठल महाराजांना सांगितले की गड दत्तक घ्यायची माझी ऐपत नाही.. तुम्ही मला दत्तक घ्या.. आपण सर्व मिळून या ठिकाणी येणा-या भाविकांसाठी सुविधा निर्माण करू.
या गडाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे हा प्रयत्न सुरू आहे आणि येणा-या काळात तो पूर्ण करू. गडाची जबाबदारी आम्ही सगळे मिळून घेऊ. बीडच्या हक्काचे पाणी देणारच असे मोठे विधान यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, पुढच्या पिढीला दुष्काळ बघू देणार नाही. संपूर्ण बीड जिल्ह्याला पाणीदार करण्याचा प्रण आहे. आम्ही आष्टी तालुक्यापर्यंत पाणी आणले आहे. बीड जिल्ह्यात सप्ताहाची मोठी परंपरा आहे. आमचे आणि बीडचे नाते आहे. यावेळी भाषणादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचा देखील उल्लेख केला.
संतांच्या आशीर्वादाने दुष्काळमुक्त करण्यासाठी ५३ टीएमसी पाणी गोदावरीमध्ये आणण्याच्या योजनेला मंजुरी दिली. मराठवाड्याला तेरा टीएमसी पाणी मिळायला हवे होते. पण ते मिळत नाही. पण आता कृष्णा-कोयनेचे पाणी या भागाला देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. येत्या काळात तीस टीएमसी पाणी मिळेल आणि पाण्यासाठी दोन जिल्ह्यांत होणारे संघर्ष टळणार आहेत. मराठवाड्याच्या हक्काचे पाणी उपलब्ध करून देऊ, असेही ते म्हणाले.