अहली : वृत्तसंस्था
इस्रायलच्या लढाऊ विमानांनी गाझा पट्टीत धुमाकूळ घातला. इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात गाझामध्ये १०० जण ठार झाले आहेत. यात उत्तर गाझामधील एका शाळेवर झालेल्या हवाई हल्ल्यात ३३ जणांचा मृत्यू तर ७० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती पॅलेस्टाइनच्या आरोग्य अधिका-यांनी दिली.
इस्रायलने गाझाच्या वेगवेगळ्या भागात केलेल्या दोन हल्ल्यात २० हून अधिक जण ठार झाले असून त्यापैकी एका हल्ल्यात संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाळेला लक्ष्य करण्यात आले आहे. अलीकडच्या काळात इस्रायलने आपल्या हल्ल्याची व्याप्ती वाढवली आहे.
इस्रायलच्या लष्कराने म्हटले आहे की, हमासवर नवा दबाव आणण्यासाठी आणि शेवटी त्याला हाकलून लावण्याच्या उद्देशाने त्यांनी हल्ले तीव्र केले आहेत. गाझाच्या नागरी संरक्षण एजन्सीने सांगितले की, युद्धामुळे विस्थापित झालेल्या लोकांसाठी निवारा म्हणून काम करणा-या शाळेवर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात किमान २५ जण ठार झाले आहे.
गाझा शहरातील तुफा येथील एका शाळेतून १४ मुले आणि ५ महिलांचे मृतदेह सापडले आहेत, परंतु जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो. अहली रुग्णालयातील नोंदींचा हवाला देत त्यांनी सांगितले की, जवळच्या हिजय्या भागात घरांवर झालेल्या हल्ल्यात इतर ३० हून अधिक गाझान नागरिक ठार झाले.
उत्तर गाझाच्या काही भागात राहणा-या नागरिकांना लष्कराने गुरुवारी गाझा शहराच्या पश्चिम भागात आश्रय घेण्याचे आदेश दिले. या भागात अतिरेकी बळाचा वापर करून काम करण्याची योजना आखल्याचा इशाराही त्यांनी दिला. लक्ष्यभागातून पळून गेलेले अनेक पॅलेस्टिनी पायी निघाले, काहींनी आपले सामान पाठीवर घेतले, तर काहींनी खेचरगाड्यांचा वापर केला. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितले की, इस्रायल गाझामध्ये नवीन सुरक्षा कॉरिडॉर स्थापन करत आहे.