ठाणे : गायी, म्हशींचे दूध पाणावण्यासाठी तीन जणांनी ऑक्सीटोसीन औषध अवैधपणे विक्रीसाठी बाळगल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडी शहरातील किडवाईनगरमधून समोर आला आहे. याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांची कुणकुण लागताच त्यांचा एक साथीदार घटनास्थळावरून फरार झाला आहे. सैफूल माजीद सनफुर्द (२७), अशिक लियाकत सरदार (२४) अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. तर लियाकत शेठ असे फरार झालेल्याचे नाव आहे.
दरम्यान, भारतीय संस्कृतीत दुधाला अनन्यसाधारण महत्त्व असून गेल्या काही वर्षांत महागाईमुळे गायी म्हशींच्या दुधाला चांगला दर मिळत आहे. याचाच फायदा घेऊन काही गायी-म्हशींच्या गोठ्यांमध्ये झटपट पैसा कमवण्यासाठी बनावट इंजेक्शन आणि औषधे खरेदी करून जादा दूध काढण्यात येण्याचे प्रमाण वाढले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील तिघेही मूळचे पश्चिम बंगालचे असून ते सद्यस्थितीत किडवाईनगरमधील टिचर कॉलनीजवळील जुबेर शेठच्या कारखान्याच्या गाळ्यात रहात आहेत. दरम्यान वरील तिघांनी रहात असलेल्या गाळ्यात गायी, म्हशींचे दूध वाढवण्यासाठी संबंधित विभागाचा कुठल्याही प्रकारचा परवाना नसताना गेल्या महिनाभरापासून ऑक्सीटोसीन औषधाची साठवणूक विक्रीसाठी केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
या ऑक्सीटोसीनचा डोस गायी, म्हशींना दिल्यानंतर ते दूध मानवी आरोग्यास हानिकारक असून त्याचे सेवन केल्याने श्रवण कमजोरी, दृष्टीहिनता, पोटाचे आजार, नवजात बाळांना कावीळ, गरोदर स्त्रीला रक्तस्त्राव आणि अनैसर्गिक गर्भपात, श्वसनाचे आजार, त्वचारोग असे गंभीर आजार होण्याची शक्यता आहे.