28.7 C
Latur
Saturday, February 14, 2026
Homeराष्ट्रीयगुंतवणूकदारांचे तब्बल ७.४० लाख कोटी बुडाले

गुंतवणूकदारांचे तब्बल ७.४० लाख कोटी बुडाले

शेअर बाजारात भूकंप, सेन्सेक्स, निफ्टीत घसरण
मुंबई : प्रतिनिधी
भारतीय शेअर बाजारात आजचा दिवस घसरणीचा ठरला. आयटी कंपन्यांच्या शेअरची विक्री, जागतिक दबावामुळे भारतीय शेअर बाजारात आज भूकंप झाला. ट्रेडिंगदरम्यान सेन्सेक्स ११०० अंकांनी कोसळला तर निफ्टीमध्येही ३५० अंकांची घसरण झाली. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे ७.४० लाख कोटी बुडाले. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

सेन्सेक्स शुक्रवारी १.२५ टक्क्यांनी म्हणजेच ११४० अंकांनी घसरला. गुरुवारी सेन्सेक्स ८३६७४.९२ अंकांवर बंद झाला होता. त्या तुलनेत आज सेन्सेक्स ८२५३४.५५ अंकांपर्यंत खाली आला. अखेर बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स १०४८ अंकांनी घसरुन ८२६२७ अंकांवर बंद झाला तर निफ्टी ३३६ अंकांनी घसरून २५४७१ अंकापर्यंत आला. सेन्सेक्सवर बजाज फायनान्स, स्टेट बँक ऑफ इंडिया वगळता इतर कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली. हिंदुस्तान युनीलिवर, इंटरनलचे शेअर चार टक्क्यांनी घसरले. टाटा स्टील, टायटन, टीसीएस, पॉवरग्रीड आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर २ टक्क्यांनी घसरले. बीईएल, एशियन पेंटस, महिंद्रा अँड महिंद्रा, एचडीएफसी बँक, अदानी पोर्टस, एचसीएल टेक्नोलॉजीज, एनटीपीसी, इन्फोसिस, आयटीसी, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक, इंडिगोच्या शेअरमध्ये एक ते दोन टक्के घसरण झाली. सनफार्मा, ट्रेंट, बजाज फिनसर्व्ह, मारुती सुझुकी, भारती एअरटेल एक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट आणि एल अँड टीचे शेअर घसरणीसह बंद झाले.

शुक्रवारी निफ्टी आयटी निर्देशांक ४ टक्क्यांपेक्षा जास्त घसरला. टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, टेक महिंद्रा, एचसीएल टेक कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली. अँथ्रोपिकच्या कॉर्पोरेट लीगल टीमने नवे टूल आणले. त्यामुळे गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले आहे.

जागतिक बाजारातील
अस्थिरतेचा फटका
आयटी कंपन्यांच्या शेअरमध्ये होणारी घसरण, जागतिक बाजारातील कमजोरीचे संकेत आणि भू राजनैतिक अनिश्चितता यामुळे गुंतवणूकदारांवर परिणाम झाला. आज आयटी क्षेत्रात सर्वात मोठी घसरण झाली. एडीआरवर लिस्ट असलेल्या इन्फोसिस आणि विप्रोच्या शेअरमध्ये १० टक्क्यांची घसरण झाली.

अमेरिकेतील घसरणीचा
शेअर बाजारावर परिणाम
अमेरिकन बाजारातील घसरणीचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम दिसून आला. अमेरिकन बाजारात नासडॅकच्या शेअरमध्ये २ टक्क्यांची घसरण झाली. डाऊ जॉन्स आणि एस अँड पी ५०० मध्येही मोठी घसरण झाली. आशियाई बाजारातही हाच ट्रेंड दिसून आला. डॉलर मजबूत आणि रुपया कमजोर झाल्याने बाजारावर त्याचा परिणाम दिसून आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR