नाशिक : प्रतिनिधी
प्रयागराज येथे कुंभात झालेल्या दुर्घटनेनंतर राज्य शासनही सजग झाले असून, गर्दी आटोक्यात यावी, वाहतुकीचे नियोजन सुरळीत व्हावे, यासाठी प्रशासनातर्फे अडीच हजार सीसीटीव्हींची नजर ठेवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, गुगलच्या मदतीने मोबाईल लोकेशनवर गर्दीचे नियंत्रण मिळविले जाणार असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महापालिकेने आराखडा करण्यास सुरुवात केली आहे.
वाहतूक व्यवस्थेच्या आराखड्याला आणखी बळकटी देण्यासाठी महापालिका व पोलिस प्रशासन गुगलसोबत थेट बैठक घेणार आहे. आराखडा गुगलला उपलब्ध करून दिल्यानंतर जगभरातून येणा-या भाविकांना गुगल मॅपच्या माध्यमातून रस्त्यांची आणि पर्यायी रस्त्यांची अद्ययावत माहिती मिळणार आहे. यामुळे भाविकांचा वेळ वाचेल. महापालिकेच्या वतीने विशेष सॉफ्टवेअर विकसित करण्याचे काम सुरू आहे.
तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसमावेशक आराखडा
कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविकांचे नाशिकमध्ये आगमन होणार असल्याने गर्दी नियंत्रण आणि वाहतूक नियोजन हे प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका व शहर पोलिस दलाने एकत्रितपणे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यास सुरुवात केली आहे. या आराखड्यात महत्त्वाचा भाग म्हणजे शहरात तब्बल अडीच हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.