25.1 C
Latur
Thursday, July 4, 2024
Homeलातूरगुगलपेक्षाही मानवी मेंदूच्या वापराचे महत्व अधिक

गुगलपेक्षाही मानवी मेंदूच्या वापराचे महत्व अधिक

लातूर : प्रतिनिधी
येथील अभिनव मानव विकास शिक्षण संस्थाद्वारा संचलित  श्रीकिशन सोमाणी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बाल साहित्यिक डॉ. संगीता बर्वे यांनी आपल्या साहित्याच्या जडणघडणीचे विश्लेषण अत्यंत  सोप्या शब्दात करुन उपस्थितांची मने  जिंकली. यावेळी बोलताना डॉ. संगीता बर्वे यांनी गुगलपेक्षाही मानवी मेंदूच्या वापराचे महत्व अधिक असल्याचे उदाहरणांसह  दाखवून दिले. विद्यार्थ्यांनीच नाही तर प्रत्येकाने याकडे विशेषत्वाने लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीकिशन सोमाणी विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच क्रीडा, विज्ञान, साहित्य अशा विविधांगी क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान मिळावे यासाठी सातत्याने सर्वतोपरी उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमांतर्गत संवाद लेखिकेशी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बाल साहित्यिक डॉ. संगीता बर्वे, संगीतकार राजीव बर्वे, गायिका प्रांजली बर्वे यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मंचावर प्रमुख पाहुण्यांसह मुख्याध्यापक रमाकांत स्वामी, पर्यवेक्षक गिरीश कुलकर्णी यांचीही उपस्थिती होती. विद्यालयाच्या कस्तुर-कंचन सभागृहात रंगलेल्या या कार्यक्रमाने केवळ विद्यार्थीच नव्हे तर विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिकाही अक्षरश: मंत्रमुग्ध होऊन गेले होते.
यावेळी डॉ. संगीता बर्वे यांनी ‘गोरा गोरा एक ससा, रडू लागला ढसाढसा’, ‘ढगोबा ढगोबा चाललात कुठे’  यासारख्या बाल  कविता प्रस्तुत करुन विद्यार्थ्यांची मने जिंकली.  गायिका प्रांजली बर्वे यांनी विद्यार्थ्यांना गीत गायन कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले. तर संगीतकार राजीव बर्वे यांनी मानवी जीवनात संगीताचे असलेले महत्व सोप्या शब्दात विशद केले.  मुख्याध्यापक रमाकांत स्वामी यांनी यावेळी  आपले मनोगत व्यक्त्त करताना विद्यार्थ्यांसाठी हा एक ऐतिहासिक, अविस्मरणीय असा कार्यक्रम असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांशी संवाद कसा साधावा, यासारखे उत्तम उदाहरण दुसरे असूच शकत नाही, एवढ्या सहज सोप्या शब्दात डॉ. संगीताताई बर्वे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या विद्यालयाच्या वतीने  विद्यार्थ्यांचे व्यक्त्तिमत्व चांगले घडावे, यासाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविले जातात. अभ्यास एके अभ्यास असे स्वरूप न ठेवता विद्यार्थ्यांची सर्वंकष जडणघडण करण्याचा प्रयत्न संस्थेच्या वतीने केला जात असल्याचे सांगून रमाकांत स्वामी यांनी मान्यवरांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय सहशिक्षिका सीमा कुलकर्णी यांनी करुन दिला. सूत्रसंचालन सहशिक्षिका माधुरी कणसे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. चेतन सारडा, सचिव कमलकिशोर अग्रवाल, कोषाध्यक्ष जयेश बजाज, शालेय समितीचे अध्यक्ष अतुल देऊळगावकर यांसह सर्व पदाधिका-यांनी विद्यालयाच्या सर्व अध्यापक, अध्यापिकांचे कौतुक केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR