नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गुगल आणि मायक्रोसॉफ्ट आता ‘पासवर्डलेस लॉगिन’कडे वेगाने पाऊल टाकत असून ‘पास-की’ ही नवी सुरक्षा यंत्रणा राबवत आहेत. मात्र, भारतासारख्या विशाल बाजारपेठेत ही यंत्रणा पूर्णपणे यशस्वी होण्यासमोर काही मोठी आव्हाने उभी राहण्याची शक्यता आहे.
‘पास-की’ हे एक असे तंत्रज्ञान आहे ज्यात तुम्हाला कोणताही शब्द किंवा नंबर लक्षात ठेवण्याची गरज नाही. तुमच्या फोनमधील फिंगरप्रिंट, फेस अनलॉक किंवा स्क्रीन लॉक पिन हीच तुमची पास-की असेल. ही सिस्टम क्रिप्टोग्राफीवर आधारित असल्याने हॅकर्सना तुमचा पासवर्ड चोरणे किंवा फिशिंग करणे अशक्यप्राय होईल.
तज्ज्ञांच्या मते, ही नवीन सिस्टम भारतात काही कारणांमुळे अडथळ्यांची ठरू शकते. भारतात मोठ्या प्रमाणावर जुन्या अँड्रॉइड आवृत्तीचे फोन्स वापरले जातात, जे ‘पास-की’ला पूर्णपणे सपोर्ट करत नाहीत. तसेच ग्रामीण भागात अजूनही साध्या की-पॅड फोनचा किंवा जुन्या तंत्रज्ञानाचा वापर होतो. अशा ठिकाणी केवळ बायोमेट्रिक्सवर अवलंबून राहणे सुरुवातीला कठीण जाऊ शकते. भारतीयांना ‘ओटीपी’ आणि पासवर्डची सवय आहे. अचानक पूर्णपणे पासवर्डलेस होणे युजर्ससाठी गोंधळाचे ठरू शकते. तसेच जर फोन चोरीला गेला किंवा बायोमेट्रिक्समध्ये तांत्रिक बिघाड झाला, तर बॅकअप आणि रिकव्हरीची प्रक्रिया भारतात किती सुलभ असेल, यावर या सिस्टमचे यश अवलंबून आहे.
गुगलने आधीच आपल्या युजर्सना ‘पास-की’कडे शिफ्ट होण्याचे आवाहन केले आहे. लवकरच अनेक बँकिंग आणि पेमेंट अॅप्स देखील ही सुविधा स्वीकारतील. हे तंत्रज्ञान सुरक्षित असले तरी, भारतातील तांत्रिक दरी भरून काढण्याचे मोठे आव्हान कंपन्यांसमोर असेल.

