संजू सॅमसन, हेटमायरचे प्रयत्न अयशस्वी
अहमदाबाद : वृत्तसंस्था
गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा ५८ धावांनी पराभव केला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना २१७ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल राजस्थान सुरुवातीच्या अपयशातून सावरू शकले नाही आणि त्यांना ५८ धावांनी सामना गमवावा लागला. कर्णधार संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटमायर यांनी खूप प्रयत्न केले, परंतु यशस्वी जयस्वाल आणि नितीश राणा यांच्यासह इतर फलंदाज अपयशी ठरले. हेटमायरने ३२ चेंडूत ५२ धावांची तुफानी खेळी केली.
या सामन्यात राजस्थान रॉयल्सना २१८ धावांचे मोठे लक्ष्य मिळाले. यशस्वी जयस्वाल आणि नितीश राणा यांनी १२ धावांनी आपल्या विकेट गमावल्याने संघाची सुरुवात खूपच खराब झाली. जयस्वाल ६ धावा करू शकला आणि नितीश फक्त १ धाव करू शकला. त्यानंतर संजू सॅमसन आणि रियान पराग यांनी मिळून ४८ धावा जोडल्या, पण पराग १४ चेंडूत २६ धावा करून बाद झाला. अशा परिस्थितीत जिथे संघाला ध्रुव जुरेलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, तिथे त्याच्या बॅटमधून फक्त ५ धावा आल्या.
राजस्थान संघ मोठअया संकटात सापडला होता. दरम्यान, संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटमायर यांनी ४८ धावा जोडल्या, पण संघ विजयाची आशा करू लागला तेव्हाच सॅमसन ४१ धावांवर बाद झाला. ११६ धावांपर्यंत राजस्थान अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. यानंतर हेटमायर काही काळ क्रीजवर राहिला, परंतु इतर फलंदाज येत राहिले आणि लवकर बाद होत राहिले. त्यामुळे राजस्थानला पराभवाचा सामना करावा लागला.
गुजरात टायटन्सकडून साई सुदर्शनने ५३ चेंडूत ८२ धावा केल्या आणि आयपीएल २०२५ मधील हे त्याचे तिसरे अर्धशतक आहे. अहमदाबादमध्ये सलग पाच अर्धशतके करणा-या सुदर्शनने पहिला भारतीय फलंदाज होण्याचा विक्रम केला आहे. प्रत्युत्तरादाखल राजस्थानकडून शिमरॉन हेटमायरने ३२ चेंडूत ५२ धावांची जलद खेळी केली पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. या विजयासह गुजरात आता पॉइंट्स टेबलमध्ये दुस-या स्थानावर पोहोचला आहे.