मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात मोठ्या प्रमाणात गुटखा हा गुजरातमधून येतो. गुटख्यामुळे अनेक लोक मरत आहेत. सरकारने एकतर कडक कारवाई करावी किंवा गुटख्यावरील बंदी उठवावी, असे वक्तव्य विधानसभेचे माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केले. यामुळे सभागृहात गदारोळ झाला. दरम्यान, गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी गुटखा व्यापा-याला पाठीशी घातलं जाणार नाही, कडक कारवाई केली जाईल, असे उत्तर दिले.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांनी आज विधानसभेत गुटख्यावरून लक्षवेधी मांडली. त्यांनी म्हटलं की, साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये महीम नावाचा गुटखा आपल्या शेजारच्या राज्यातून येतो. सकाळी तीन ते पाच या दरम्यान आठवड्यातून दोन वेळेस मोठ्या प्रमाणात गुटखा येतो. हे खरे आहे का आणि असल्यास याच्यावर कारवाई का केली नाही घाटकोपर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बीट चौकीच्या बाजूला दहा मीटरवर गुटखा आणि अंमली पदार्थ विकले जातात, हे पोलिसांना दिसत नाही का? त्याच्या समोरच्या जागेत सात लोकांचं रॅकेट आहे, त्या ठिकाणी काही कारवाई होणार का हिरानंदानी ही उच्च वस्ती आहे. हिरानंदानी कॉलेजच्या परिसरात दहा मीटरवर पान स्टॉल सुरु आहे. या स्टॉलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ विकले जातात, यावर कारवाई करणार का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, विलास लांडे यांच्या मतदारसंघात फईम अहमद शेख नावाच्या व्यक्तीचे त्याच्या भावाच्या नावाने दुकान आहे. गुटख्याच्या विक्रीमध्ये या व्यक्तीला अगोदर देखील अटक केलेली आहे. त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केलेला आहे. त्याची तडीपारी देखील करण्यात आली होती. परंतु, हायकोर्टातून तडीपारी रद्द करण्यात आली. कोणीही अनधिकृतपणे व्यवहार करत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. तुमच्याकडे जे पण माहिती उपलब्ध आहे ती माहिती मला द्यावी, नक्कीच यावर कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी म्हटले.
यानंतर विजय वडेट्टीवार म्हणाले की, पोलिसांनी मनात आणलं तर एक सुद्धा गुटख्याची पुडी कोणी विकू शकत नाही. शासनाने कारवाई करावी नाहीतर ही बंदी उठवावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर गुटखा लॉबीला मदत करण्यासाठी आपण बंदी उठवा, असे म्हणता का? असा सवाल अनिल साटम यांनी उपस्थित केला. यानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, गुटख्यावर कारवाई होत नाही असे नाही. मागच्या वर्षात आपण १५० कोटी पेक्षा जास्त गुटखा पकडला आहे. गुटखा व्याप-याला पाठीशी घातलं जाणार नाही, कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी म्हटले.