ठाणे : बहुचर्चित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग गुढीपाडव्यापासून १०० टक्के खुला होणार आहे. हा महामार्ग ७०१ कि.मी.चा असून सध्या ६२५ कि.मी.चा मार्ग सुरू आहे. ७६ कि.मी.चा मुंबईकडील टप्पा आता सुरू होत आहे. मात्र, हा प्रवास महागणार आहे.
एक एप्रिलपासून हलक्या वाहनांना २ रुपये ६ पैसे, मध्यम वाहनांना ३ रुपये ३२ पैसे, मोठ्या वाहनांना ६ रुपये ९७ पैसे, ट्रेलरसाठी १० रुपये ९३ पैसे असे दर नव्या आर्थिक वर्षात लागू करण्यात येणार आहेत.
२०२२ मध्ये हा महामार्ग सुरू झाल्यानंतर हलक्या वाहनांसाठी हा दर एक रुपये ७३ पैसे होता.
त्यात ३३ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गातील प्रवास हा जवळपास १९ टक्क्यांनी महागणार आहे. आतापर्यंत नागपूर ते इगतपुरी असा मार्ग सुरू आहे. इगतपुरी ते ठाणे हा टप्पा आता सुरू होत आहे. याला गुढीपाडव्याचा मुहूर्त काढला असल्याचे सांगण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस सरकारचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून तो २०१४ मध्ये ते मुख्यमंत्री असताना सुरू झाला होता. आता पुन्हा फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर तो पूर्ण झाला असून गुढीपाडव्याला सुरू होणार आहे.