27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रगुर्जर ठरविणार रोहिणी खडसेंचा जय-पराजय

गुर्जर ठरविणार रोहिणी खडसेंचा जय-पराजय

जळगाव : विशेष प्रतिनिधी
मुक्ताईनगर जळगाव जिल्ह्यातील समृद्ध तालुका आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी प्रतिनिधित्व केलेल्या हा मतदार संघ आहे. १९६७ पासून ते १९८५ पर्यंत प्रतिभाताई पाटील मुक्ताईनगर तालुक्याच्या आमदार होत्या. प्रतिभाताई पाटील काँग्रेसमध्ये असताना या मतदार संघावर काँग्रेसचे वर्चस्व होते. त्यानंतर मात्र कोथळीचे सरपंच एकनाथ खडसे यांनी भाजपला वाढवण्याचे काम केले. ते १९८९ मध्ये पहिल्यांदा या मतदार संघातून आमदार झाले.
 १९८९ ते २०१९ दरम्यान त्यांनीच या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले. परंतु २०१९ मध्ये त्यांना तिकीट नाकारण्यात आले. त्यानंतर मुक्ताईनगर मतदार संघातील गणिते बदलली. आता पुन्हा खडसे यांची मुलीसाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे आणि विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात लढत होत आहे. मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसे यांच्या भावजय असलेल्या रक्षा खडसे भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री आहेत. त्यांची नणंद  रोहिणी खडसे शरद पवार गटाकडून विधानसभेत उमेदवार आहेत. त्यामुळे ही लढत लक्षवेधी ठरली आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार मुक्ताईनगरमध्ये अनुसूचित जातीचे ४०,७७१ मतदार आहेत. हे प्रमाण १३.७७% आहे. अनुसूचित जमातीच्या मतदारांची संख्या अंदाजे ३८,४९२ आहे. हे प्रमाण १३% आहे. मुस्लिम मतदारांची संख्या २६,३५२ आहे. ग्रामीण मतदारांची संख्या अंदाजे २,७९,२४२ आहे. या मतदार संघात मराठा, लेवा पाटील आणि गुर्जर मतदारांचे वर्चस्व आहे. रोहिणी खडसे लेवा पाटील तर चंद्रकांत पाटील मराठा आहेत. गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यामुळे गुर्जर मतदार चंद्रकांत पाटील यांच्यासोबत जाणार का? या प्रश्नाच्या उत्तरात रोहिणी खडसे यांचा जय-पराजय अवलंबून आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR