लातूर : प्रतिनिधी
गूळ मार्केट ते जुन्या रेल्वे लाईनच्या पार्किंग परिसरात लातूर मनपा कचरा टाकत असल्यामुळे दुर्गंधी निर्माण होत आहे. या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गूळ मार्केट ते जुन्या रेल्वे लाईनच्या पार्किंग परिसरात घंटागाड्यांद्वारे कचरा आणून अनधिकृतपणे कचरा संकलन केले जात आहे. बाजूलाच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसर, समोरच्या बाजूला नामांकित महाविद्यालये, दवाखाने, हाकेच्या अंतरावर जुने व मध्यवर्ती नवीन बस स्थानक आहे. गूळ मार्केट व कृषी उत्पन्न बाजार समिती, बीएसएनएलचे मुख्य कार्यालय, गांधी चौकाकडे जाणा-या रस्त्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. लातूर शहरातील चारचाकी वाहतूक पार्किंग व्यवस्था याच परिसरात आहे.
दोनच दिवसांपूर्वी कच-याला आग लागली होती. यामुळे लातूर शहर महानगरपालिकेचा कचरा उचलण्यासाठी देण्यात आलेले ठेकेदार जाणूनबुजून महापालिका आयुक्तांच्या व प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत तर नाही ना असाच प्रश्न निर्माण झाला आहे. त्वरित संबंधितांनी अनधिकृत कचरा संकलन करणा-यांना समज द्यावी व तेथील कचरा संकलन बंद करावे अन्यथा राष्ट्रवादी अर्बन सेलच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.