पुणे : प्रतिनिधी
पुणे जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघ, सहकारी पतसंस्था महासंघ, सहकारी बँक महासंघ यांच्या वतीने महाराष्ट्रातील गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स यांच्यासाठी महाअधिवेशन आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या दि. २२ आणि २३ रोजी गणेश कला क्रीडा मंच येथे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत संगितली.
सहकार मंत्रालय केंद्र आणि राज्य, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, पुणे व पिंपरी- चिंचवड महानगरपालिका, पुणे आणि महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघ, पतसंस्था, बँका महासंघ, म्हाडा सिडको, क्रेडाई मेट्रो, ज्येष्ठ नागरिक संघ, महिला मंडळे, हास्य क्लब, विविध शैक्षणिक संस्था आणि इतर समविचारी संघटनांच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले आहे.
सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी पुर्नविकसन, स्वयं-पुर्नविकसन, घनकचरा, ओला-सुका कचरा व्यवस्थापन, ई-चार्जिंग सुविधा, अपारंपरिक ऊर्जा, सौर ऊर्जा, सोसायट्यांच्या खरेदी खत, मानवी हस्तांतरण, निवडणुका, तंटामुक्त सोसायटी, टँकरमुक्त संस्था, सहकार मित्र, सहकार संवाद ऑनलाईन पोर्टल, बिगरशेती कर, सायबर क्राईम, सीसीटीव्ही, रेन वॉटर हार्वेस्टिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, सदनिका खरेदी, विक्री, भाड्याने देणे, संस्थांमधील पाळीव प्राणी, सहकारातील असहकार, इत्यादी विषयांवर चर्चासत्र, परिसंवाद आणि प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. तसेच, ग्रीन सोसायटी पुरस्कार आणि स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले आहे. सहकारी संस्थांच्या समस्यांवर विशेष सत्र घेतले जाणार आहे.