जळकोट : प्रतिनिधी
जळकोट शहरामध्ये एचपी कंपनीच्या गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. यास्फोटामध्ये घरातील पाच जण गंभीरित्या भाजले आहेत. या स्फोटामुळे लागलेल्या आगीत तब्बल १८ ते २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल विभाग तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्यात आला.
जळकोट शहरातील अडतलाइनच्या पाठीमागे राहणारे अविनाश दत्तात्रय गबाळे यांच्या घरी दि. ११ जानेवारी रोजी सकाळी सात ते आठच्या दरम्यान एच. पी कंपनीचा गॅस सिलेंडर संपल्यामुळे नवीन गॅस सिलेंडरचे सील तोडण्यात येत होते. सिल तोडताना एकदम गॅस सिलेंडर मधून वायु गळती होण्यास सुरुवात झाली. अतिशय वेगाने गॅस बाहेर आला, यामुळे गॅस सिलेंडर आडवा पडला. यानंतर वेगाने गॅस मधील वायू गळती होऊ लागली. काही क्षणांमध्येच घरामध्ये मोठा अगडोंब उडाला. घरामध्ये जिकडे तिकडे आगच पाहायला मिळाली. अगदी सिलिंगचा फॅन देखील जळून खाक झाला. यामध्ये घरामध्ये असलेले अविनाश दत्तात्रय गबाळे, प्रशांत अविनाश गबाळे, मिरा अविनाश गबाळे, अमृता प्रशांत गबाळे, तसेच लहान मुलगा सर्वज्ञ प्रशांत गबाळे हे आगी मध्ये गंभीरित्या भाजले. यांच्यावर उदगीर येथील एका खाजगीर गुन्हाळ्यामध्ये उपचार सुरू आहेत .
सिलेंडर आडवा पडल्यामुळे आग देखील कुणालाही आटोक्यात आणणे शक्य झाले नाही. जवळपास अर्धा तास हा सिलेंडर आडवा फिरत होता. यामुळे घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. तीन-चार महागडे मोबाईल, स्मार्ट वॉच, फ्रिज कुलर, वॉशिंग मशीन, टि. व्ही, खुर्च्या टेबल, लॅपटॉप, घरातील पंखे, वायर, पाईप यासह इतर अनेक वस्तू जळून खाक झाल्या आहेत. या गॅस गळतीमुळे घरातील जवळपास १८ ते २० लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांनी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला. तसेच यावेळी त्यांनी गॅस कंपनीच्या प्रतिनिधीशी देखील चर्चा केली. या सोबतच महसूल विभागाच्या वतीने मंडळ अधिकारी तसेच तलाठी यांनी देखील भेट देऊन पंचनामा केला.