38.6 C
Latur
Wednesday, April 16, 2025
Homeमहाराष्ट्रगेल्या १०० दिवसांत महायुतीने राज्यासाठी काय केले?

गेल्या १०० दिवसांत महायुतीने राज्यासाठी काय केले?

नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्रात १०० दिवसांमध्ये महिलांसाठी एकतरी चांगली योजना आणली का? गेल्या १०० दिवसांमध्ये शेतक-यांसाठी एकतरी चांगली योजना आणली का? तसेच या १०० दिवसांमध्ये तरुण-तरुणींसाठी काय केले? असे अनेक सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केले. नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे शिबिर सुरू असून यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांनी भाजपसह महायुतीवर निशाणा साधला.

नाशिकमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिबिरात आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, मी संजय राऊत यांना फोन केला होता. यावेळी त्यांना विचारले की संजय काका उद्या काय बोलायचे आहे? मला विषय काय दिला आहे?

तुम्हाला त्यांची स्टाईल माहिती आहे, ते पटकन काहीतरी बोलून जातात. त्यांनी मला सांगितले, महाराष्ट्र नेमका चाललाय कुठे यावर बोल. असा किस्सा सांगत त्यांनी माहिती दिली. ‘‘या सरकारला १०० दिवस उलटून गेले आहेत. पहिले १०० दिवस हनिमून पिरेड मानला जातो. या काळात मुख्यमंत्री जे काही करतात, त्याचे कौतुक साधारणपणे केले जाते. पहिल्या १०० दिवसांत एकही चांगली योजना कोणासाठीही आणली नाही, असे म्हणत त्यांनी निशाणा साधला.

देवेंद्र फडणवीस बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत होते, आमचे सरकार येणार, सरकार आल्यानंतर हे करू वगैरे काय काय सांगत होते ते. शेतक-यांना कर्जमाफी मिळणार, सातबारा कोरा करणार इत्यादी म्हणाले होते. यावेळी शेतक-यांची वीजमाफी सांगितली होती. त्यांचे १३६ आमदार निवडून आले. हे फडणवीसांचेच सरकार आहे. एकनाथ शिंदे तिथे चिकटण्यासाठी चिकटले आहेत. कारण बाहेर पडले तर तुरुंगात जातील. आता अमरावतीहून थेट गावी जाणार आहेत. कारण नाराजीचे नाट्य सुरू झाले आहे. आता पुढचं मी काही बोलत नाही’’ असे म्हणत आदित्य ठाकरेंनी टोलाही लगावला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR