नाशिक : प्रतिनिधी
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जो पर्यंत गोदावरी नदी प्रदूषणमुक्त होत नाही तोपर्यंत गोदावरीत स्रानासाठी बंदी घालावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली. गोदावरी संवर्धनासाठी मास्टर प्लॅन केला जात असल्याचा प्रशासनाचा दावा आहे.
नाशिकमध्ये दर १२ वर्षानी भरणारा कुंभमेळा २०२७ ला भरणार आहे, त्या पार्श्वभूमीवर आतापासूनच नियोजनाला सुरुवात झाली आहे. आरोग्य, सार्वजनिक बांधकाम विभाग आपत्ती व्यवस्थापन अशा वेगवेगळ्या विभागाकडून प्रस्ताव सादर केले जात असतानाच गोदावरी संवर्धनाचा मुद्दाही चर्चेत आला आहे. ज्या गोदावरीच्या सान्निध्यात कुंभमेळा भरतो, त्या गोदावरीची प्रदूषणापासून मुक्तता जो पर्यंत होत नाही, तोपर्यंत गोदावरी नदीत स्रानासाठी बंदी घालावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली.
मागील कुंभमेळा काळात देखील गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा चर्चेत आला होता, त्यावेळी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून गोदावरीचे पाणी मानवी आरोग्यास हानिकारक असल्याने स्रानासाठी बंदी घालण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. त्यावेळी उच्च न्यायालयाने दिलेले आदेश आणि सूचनांचे पालन अद्यापही केले नसल्याची खंत पर्यावरण प्रेमी व्यक्त करत आहेत.
गोदावरी नदी पात्रात आजही गटार,नाल्याचे पाणी सोडले जाते, जागोजागी पानवेलीचे साम्राज्य वाढले आहे, नदीच्या प्रदुषित पाण्यात भाविक श्रद्धेनं डुबकी मारत असून महानगरपालिका सर्रासपणे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळेच आता विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी कमांड हाती घेतली असून कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर गोदावरीसाठी मास्टर प्लॅन तयार केला आहे.