लातूर : प्रतिनिधी
येथील श्री. गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालयात संपदा वांगे हिचा युपीएससी या परीक्षेत ८३९ क्रमांकाने सुयश प्राप्त केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, शालेय समिती अध्यक्षा कुमुदिनी भार्गव, प्राथमिक शाळेचे शालेय समिती अध्यक्ष बालकिशन बांगड, विश्वस्त मंडळ सदस्य सूर्यप्रकाश धूत, शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता कासार यांची उपस्थिती होती. सत्कारमूर्ती संपदा वांगे आणि तिचे कुटुंबीय यांचा यथोचित सत्कार लक्ष्मीरमण लाहोटी आणि कुमुदिनी भार्गव यांच्या हस्ते करण्यात आला.
मुख्याध्यापिकांनी आपल्या प्रास्ताविकेतून संपदाच्या यशाने शाळेच्या उज्ज्वल परंपरेत भर पडली, असे सांगितले. शालेय समिती अध्यक्षा कुमुदिनीजी भार्गव यांनी संस्थेच्या वतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. उपस्थितांचे आभार कमल खिंडे यांनी मानले तर सूत्रसंचालन माया माने यांनी केले. कार्यक्रमास सर्व विद्यार्थिनी, शिक्षिका वृंद व कर्मचारी वृंद विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.