परभणी : सोनपेठ तालुक्यातील मोहळा शिवारात रविवार, दि. १४ जून रोजी सकाळी गोदावरी नदीपात्रात अंघोळीसाठी गेलेल्या २ मुली व १ महिलेचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. बुडत असलेल्या महिलेला वाचविण्याचा प्रयत्न करत असताना ही घटना घडली असल्याचे समजते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सिंधूबाई दत्तराव जाधव, उत्कर्षा उत्तम जाधव (वय १९) आणि समीक्षा उत्तम जाधव (वय १७) या रविवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास गोदावरी नदीपात्रात अंघोळीसाठी उतरल्या होत्या. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने एक महिला बुडू लागल्याचे लक्षात येताच इतरांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला.
पाण्याची खोली व प्रवाहाचा अंदाज न आल्याने तिघींचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृत तिघीही शेतकरी कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे. सिंधूबाई जाधव यांच्या नावे भिसेगाव शिवारात शेती आहे. उत्कर्षा व समीक्षा जाधव यांच्या वडिलांच्या नावे मौजे मोहळा शिवारात शेती आहे. या घटनेमुळे संबंधित कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे मोहळा व परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. संबंधित यंत्रणांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.
















