31.6 C
Latur
Thursday, April 17, 2025
Homeमहाराष्ट्रगोदावरी प्रदूषणाविरोधात मनसे आक्रमक

गोदावरी प्रदूषणाविरोधात मनसे आक्रमक

पदाधिका-यांनी घेतल्या रामकुंडात उड्या!

नाशिक : प्रतिनिधी
नद्यांचे प्रदूषण हा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी चर्चेत आणलेला मुद्दा आहे. त्यावर नाशिकच्या पदाधिका-यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरू केले. गोदावरी प्रदूषणाविरोधात महापालिकेला जोरदार इशारा देण्यात आला.

मनसेचे प्रदेश सचिव दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज गोदावरी रामकुंडावर आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी, पदाधिका-यांनी रामकुंडात उड्या घेत महापालिका आणि शासनाचा जोरदार निषेध केला. महापालिकेने याबाबत तातडीने पावले टाकावीत अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

पक्षाचे प्रदेश सचिव दिनकर पाटील, महानगरप्रमुख सुदाम कोंबडे, अंकुश पवार, माजी नगरसेविका सुजाता ढेरे, सलीम शेख यांचे विविध पदाधिका-यांनी आंदोलनात भाग घेतला. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी घोषणा देत प्रशासनाला इशारा दिला. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या इशा-यानंतर हे आंदोलन झाले.

मनसेने गोदावरी प्रदूषणाविरोधात आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महापालिका प्रशासन जागे झाले होते. दोन दिवसांपासून नदीपात्रातील पानवेली काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र गोदावरी प्रदूषित करणा-या सांडपाण्याच्या प्रवाहांबाबत फारशी हालचाल झालेली नाही.

दोन वर्षांनी नाशिक शहरात सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. या निमित्ताने लक्षावधी भाविक नाशिकला येतात. नाशिकला रामकुंडात आणि गोदावरी नदीत सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी स्नानाला भाविक येतात. त्यामुळे गोदावरी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनीही गोदावरी प्रदूषणमुक्त करण्याला प्राधान्य देणार असल्याचे जाहीर केले होते.

मुंबईत शिवाजी पार्कला झालेल्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी सिंहस्थ कुंभमेळा आणि नद्यांचे प्रदूषण या विषयाला हात घातला होता. त्यामुळे गोदावरीचे प्रदूषण तातडीने रोखण्यात यावे यासाठी मनसेने आक्रमक होत प्रशासनाला इशारा दिला. त्या दृष्टीने आज रामकुंडात उड्या घेत पदाधिका-यांनी आंदोलन केले. प्रदूषणमुक्त होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा यावेळी पक्षाचे सचिव पाटील यांनी दिला.

भाजपची कोंडी होण्याची शक्यता
नाशिक शहरात गोदावरी प्रदूषणावर मनसे आक्रमक झाली आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे महापालिकेसह राज्यात सत्तेत असलेल्या भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे. या आंदोलनामुळे अन्य राजकीय पक्षांनीही धास्ती घेतली आहे. पुढच्या टप्प्यात मनसे काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR