विरोधक आक्रमक, प्रस्ताव कोणत्या नियमाआधारे?
मुंबई : प्रतिनिधी
विधान परिषदेच्या उपसभापती निलम गो-हे यांच्या विरोधात विरोधकांनी अविश्वास ठराव मांडला होता. असे असताना आज अचानक भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी सभागृहात गो-हे यांच्या समर्थनार्थ विश्वास प्रस्ताव सादर केला आणि सभागृहात तो मंजूरही झाला. या विश्वास प्रस्तावावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. उपसभापतींच्या समर्थनार्थ कुठल्या नियमाखाली विश्वास प्रस्ताव आणला, अविश्वास प्रस्तावासाठी नियम असतील तर विश्वास प्रस्तावाचे काय, असा सवाल विरोधकांनी केला. त्यावरून गदारोळ झाला.
विधान परिषदेचे कामकाज चुकीच्या पद्धतीने केल्याचा सभापती राम शिंदे आणि तालिका सभापती चित्रा वाघ यांच्यावर आरोप करण्यात आला. एकाकी पद्धतीने तालिका सभापती काम करत असल्याचे विरोधकांनी म्हटले. आज कुठेही सभागृहाच्या कार्यक्रमात नसताना भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी गो-हे यांच्यावर विश्वास ठराव मांडला. त्यांच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे रेटून त्यांनी गो-हेंबद्दलचा विश्वास ठराव मंजूर करून घेतला. आम्हाला बोलण्याची संधी दिली नाही, अशा शब्दात अंबादास दानवे यांनी संताप व्यक्त केला आणि सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. एवढे करूनही उपसभापती नीलम गो-हे उद्या डायसवर बसल्यास कामकाजात सहभागी होणार नाही, असा इशारा विरोधी पक्षांनी दिला.
आज काळ््या फिती
लावून कामकाज
लोकशाही असल्याने विरोधी पक्षाच्या एका तरी आमदाराला भूमिका मांडू दिली पाहिजे. याचा निषेध म्हणून गुरुवारी विधान परिषदेचे कामकाज काळ््या फिती लावून करणार आहोत. उपसभापती जेव्हा सभापतीच्या खुर्चीवर बसतील तेव्हा एकही महाविकास आघाडीचा आमदार सभागृहात बसणार नाही, अशी भूमिका मविआच्या आमदारांनी घेतली.
सभापतींविरोधात अविश्वास ठराव
सभागृहात मुख्यमंत्री होते, विधान परिषद अध्यक्ष होते. मात्र, विरोधी पक्षातील आमदारांना बाजू मांडू दिली नाही. सभागृहाचे कामकाज नियम डावलून केले जात आहे. त्यामुळे सभापती राम शिंदे यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी अविश्वास ठराव मांडला असून उद्या राज्यपालांची भेट घेऊन सभापतींविरोधात तक्रार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.