लातूर : प्रतिनिधी
लातूरचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने ७२ व्या यात्रा महोत्सवाचे आयोजन दि. २६ फेब्रुवारी ते १७ मार्चदरम्यान करण्यात आले आहे. २० दिवस चालणा-या या यात्रा महोत्सवात धार्मिक, आरोग्य, सामाजिक यासह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. सकाळी ९.३० वाजता जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर ‘श्री’ ची महापूजा करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घुगे यांच्या हस्ते आज सकाळी ९.३० वाजता ध्वजारोहण व ‘श्री’ ची महापूजा करण्यात येणार आहे. त्यानंतर संत सावता माळी भजनी मंडळ व माळी समाज बांधवांच्या वतीने माळीगल्ली येथून मिरवणूक काढण्यात येणार आहे. मंगळवारी मध्यरात्री १२ पासूनच देवस्थान व भालचंद्र ब्लड बँक यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी बुधवारी दुपारी १ वाजता गौरीशंकर मंदीर ते सिध्देश्वर मंदीर यादरम्यान पारंपारिक झेंड्यांच्या काठ्यांची झेंडा मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर याच दिवशी रात्री ८ ते ११ यादरम्यान सूरमनी पंडित बाबूराव बोरगावकर व तालमनी पंडित डॉ. रामभाऊ बोरगावकर यांचे संगीत भजन व ९ ते ११ यादरम्यान हभप ज्ञानोबा माऊली महाराज आष्टेकर यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रा. लक्ष्मण श्रीमंगले, प्रा. शिवकुमार उरगुंडे, प्रा. विश्वनाथ स्वामी व तुकाराम आवाड, कृष्णा हुमनाबादे, दिनेश पोखरकर, सूर्यकांत घोडके, हरिष कुलकर्णी, शिवाजी जाधव व मनोज बारसकर, प्रा. ईश्वर घोरपडे, संतोष थोरात, सचिन जाधव, भजनसम्राट उद्धवबापू, रामेश्वर महाराज सुपेकर, हभप एकनाथ महाराज, विक्रम कोतवाड, भुजंग मुर्के, विठ्ठलराव जगताप, शंकर जगताप,अक्षय चव्हाण व गणेश सुतार यांचे संगीत भजन होणार आहे. तालमनी गोपाळ जाधव यांचा गजर नामाचा हा मृदंग वादनाचा कार्यक्रम होणार आहे. पशु प्रदर्शन, अश्व व र्श्वान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. जिल्हास्तरीय महिला भजन स्पर्धा, महिलांचा रुद्राभिषेक होणार असून यादरम्यान महिलांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १०१ महिलांचे श्रीमती सरोजताई बोधनकर यांच्या उपस्थितीत हरिपाठ वाचन होणार आहे. जंगी कुस्तांचा फड रंगणार असून या स्पर्धेतील विजेत्याचा श्री सिध्देश्वर केसरीने सन्मान होवून त्यास चांदीची गदा देण्यात येणार आहे.
सोमवार दि. १७ मार्च रोजी रात्री ८ वाजता लातूर येथील उपविभागीय अधिकारी श्रीमती रोहिणी न-हे-विरोळे यांच्या हस्ते शोभेच्या दारुची आतिषबाजी करुन यात्रा महोत्सवाचा समारोप होणार आहे. या विविध उपक्रमांना भाविकांसह यात्रेकरु व शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रशासक सचिन जांबूतकर यांच्यासह देवस्थानच्या विश्वस्तांनी केले आहे.