सातारा : प्रतिनिधी
९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा तिसरा दिवस कथांच्या उत्कट सादरीकरणाने उजळून निघाला. दैनंदिन जीवनातील साधे प्रसंग, मानवी स्वभावाचे पैलू आणि बदलत्या समाजवास्तवाचे दर्शन घडवणा-या कथांनी सातारकर रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. विशेषत: शालेय विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने कथाकथनाचा हा सोहळा ख-या अर्थाने रंगला.
व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील, मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह विनोद कुलकर्णी होते. सूत्रसंचालन प्रा. मोहन गुरव यांनी केले. शब्दांच्या या मैफिलीने साहित्यातील ‘कथा’ हा प्रकार आजही तितकाच जिवंत आणि प्रभावी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले.
ग्रामीण बाज : कार्यक्रमाची सुरुवात राजेंद्र गहाळ यांनी ‘लगीन पटका’ या कथेने केली. ग्रामीण संस्कृती, लग्नसराईतील गडबड आणि सर्वसामान्य कुटुंबातील मानसिकता त्यांनी इतक्या सोप्या भाषेत मांडली की, श्रोते त्या कथेशी एकरूप झाले. त्यानंतर, ‘श्वास’ चित्रपटाच्या लेखिका माधवी घारपुरे यांनी ‘रेल्वे प्रवास’ ही कथा मांडली. स्वत:च्या अनुभवावर आधारित या कथेतून त्यांनी रेल्वेतील सहप्रवासी, त्यांचे मुखवटे आणि अडचणीच्या वेळी दिसणारे खरे चेहरे यांचे मार्मिक चित्रण केले.
स्त्री मनाचा कोपरा.. : कार्यक्रमाचा समारोप कल्पना देशपांडे यांच्या ‘त्या दरवाजा आड’ या कथेने झाला. स्त्री जीवनातील गुंतागुंत, भावनिक वलये आणि बंद दरवाजाआड दडलेले त्यांचे भावविश्व त्यांनी अत्यंत संवेदनशीलतेने उलगडले. संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते प्रा. मोहन गुरव आणि कथाकथनकार यांचा सन्मान करण्यात आला.

