लातूर : प्रतिनिधी
महावितरणच्या लातूर परिमंडलात टेक्नोसेव्ही ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, जानेवारी महिन्यात ३ लाख ८७ हजार ३१८ ग्राहकांनी २४ कोटी ५० लाख रुपयांची वीजबिले ऑनलाईन भरली आहेत. महावितरणच्या वतीने वीजग्राहकांना www.mahadiscom.in या वेबसाईटवर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाईन पद्धतीने कितीही रकमेचे वीजबिल ऑनलाईन भरण्याची सोय उपलब्ध आहे. त्याची कार्यपद्धती महावितरणच्या वेबसाईटवर दिलेली आहे.
डिजीटल इंडियाच्या वाटचालीत आता महावितरणच्या वीजग्राहकांनी जोमाने सहभाग नोंदवला आहे. महावितरणच्या लातूर परिमंडलातील पावणेपाच लाखांहून अधिक ग्राहकांनी जानेवारी महिन्यात घरबसल्या ऑनलाईन पध्दतीचा वापर करीत वीजबील भरले आहे. त्यामुळे ग्राहकांचे बिल भरणा केंद्रासमोर रांगेत उभे राहण्याचे कष्ट व वेळ वाचले आहेत, शिवाय बिलात ०.२५ टक्के सवलतही मिळाली. दरम्यान, १ जानेवारी ते ३१ मे या काळात सलग तीन वा अधिक वीजबिले ऑनलाईन भरणा-या ग्राहकांना लकी ड्रॉद्वारे स्मार्टफोन, स्मार्टवॉच अशी आकर्षक बक्षिसे जिंकण्याची नामी संधी आहे. सर्व ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन लातूर परिमंडलाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी केले आहे.
ग्राहकांना क्रेडिट, डेबिट कार्ड, नेट बँकिंग व यूपीआय इत्यादी इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी त्यांचे वीजबिल भरता येते. ५ हजार रुपयांपेक्षा जास्त बिल असणा-या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस, एनईएफटीद्वारे बिल भरता येते. क्रेडिट कार्ड वगळता इतर सर्व पद्धतीने वीजबिल भरण्यास कसलेही शुल्क लागत नाही. तसेच ऑनलाईन पेमेंटला बिलाच्या रकमेच्या ०.२५ टक्के इतकी सवलतही देण्यात आलेली आहे. वीजबिलांचे ऑनलाईन पेमेंट अत्यंत सुरक्षित असून, त्यास रिझर्व्ह बँकेच्या पेमेंट व सेटलमेंट कायदा-२००७ च्या तरतूदी लागू आहेत. वीजबिलाचे ऑनलाईन पेमेंट केल्यास ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएसद्वारे त्वरित पोच मिळते. तसेच ६६६.ेंँं्िर२ूङ्मे.्रल्ल या वेबसाईटवर ‘पेमेंट हिस्ट्री’ तपासल्यास वीजबिल भरणा तपशील व पावतीही उपलब्ध होते. त्यामुळे ऑनलाईन बिल भरण्याच्या सुविधेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी केले आहे.
महावितरणच्या प्रत्येक उपविभाग स्तरावर एप्रिल, मे व जून २०२५ या प्रत्येक महिन्यात एक प्रमाणे तीन लकी ड्रॉ ऑनलाईन काढण्यात येणार आहेत. प्रत्येक लकी ड्रॉमध्ये पाच विजेत्यांना स्मार्टफोन व स्मार्टवॉच ही बक्षिसे दिली जाणार आहेत. वीजबिल भरणा केलेली रक्कम किमान १०० रुपयांच्यावर असायला हवी. लकी ड्रॉ घोषित करण्यापूर्वीच्या महिन्याच्या अंतिम दिवशी ग्राहकाची थकबाकीची रक्कम १० रुपयांपेक्षा कमी असावी. एक ग्राहक क्रमांक केवळ एका बक्षिसासाठी पात्र राहील.