शिकागो : वृत्तसंस्था
गेल्या तीन दशकांपासून अमेरिकेत व्यवसाय करत असलेल्या एका भारतीय वंशाच्या व्यावसायिकाला अमेरिकेच्या इमिग्रेशन विभागाने अचानक ताब्यात घेतले आहे. दीड महिन्याहून अधिक काळ तुरुंगात असलेल्या परमजीत सिंग यांच्या अटकेमुळे त्यांचे कुटुंब हताश झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ते कायदेशीर ग्रीन कार्ड धारक आहेत आणि अनेक वर्षांपासून ते अमेरिकेत शांततापूर्वक राहत आहेत.
३० जुलै रोजी परमजीत सिंग भारतातून परत येत असताना शिकागोच्या ओ’हेअर विमानतळावर त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक वर्षांपूर्वी केलेल्या एका किरकोळ गुन्ह्यासाठी त्यांना अटक करण्यात आली आहे. अनेक वर्षांपूर्वी त्यांनी एका पे-फोनचा वापर केला होता, मात्र त्याचे बिल दिले नव्हते.
परमजीत यांच्या कुटुंबाने त्यांच्या सुटकेसाठी जामीन अर्ज दाखल केला होता आणि त्यांना जामीन मंजूरही झाला आहे. मात्र, अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाने जामीन प्रक्रियेला सातत्याने उशीर लावला, ज्यामुळे कुटुंबीय चिंतेत आहेत. या प्रकरणी अमेरिकन सरकारचे म्हणणे आहे की, ग्रीन कार्ड हा एक अधिकार नसून, एक विशेषाधिकार आहे. जुना गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या नागरिकांना तपासणीसाठी ताब्यात घेतले जाऊ शकते. मात्र, परमजीत यांच्या कुटुंबीयांनी आणि वकिलांनी असे म्हटले आहे की, त्यांनी नेहमीच नियमांचे पालन केले आहे आणि अमेरिकेत राहून योगदान दिले आहे.