लातूर : प्रतिनिधी
दोन सदस्यांना सोबत घेऊन १ जुन २०१९ रोजी ग्रीन लातूर वृक्ष टिमचे काम सुरु झाले. शहरात वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन व शहर स्वच्छ, हरित, सुंदर करण्याच्या या प्रयत्नाला आज दि. २८ फेब्रुवारी २०२५ रोजी पाहता पाहता २१०० दिवस पुर्ण होत आहेत. ग्रीन लातूर वृक्ष टिम आज ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशन म्हणून कार्यरत आहे.
वृक्ष संगोपन कार्यास कुठलाही एकच चेहरा न देता समाजातील सर्वांना जे येतील त्यांना सोबत घेऊन ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशनचे काम अविरतपणे सुरु आहे. दोन सदस्या पासून सुरुवात झालेली ही चळवळ आज ८०-९० सक्रिय सदस्यांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. २१०० दिवसानंतरही या चळवळीला कोणी अध्यक्ष नाहक़ोणी पदाधिकारी नाहीत, अशा पद्धतीने कार्य करणारी ही जगभरातील एकमेव टीम किंवा ग्रुप असेल. ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशनमध्ये फक्त श्रमदानाला महत्त्व आहे. दररोज तीन ते चार तास श्रमदान करावे लागते, घाम गाळावा लागतो.
दुखणारे हातपाय सोबत घेऊन घरी जावं लागतं एक दिवस नाही दररोजचं. हे करत असताना सर्व काही काटेकोरपणे प्रामाणिकपणे केले जाते. मागील सहा वर्षाच्या काळात स्थानिक, राज्यस्तरीय, देश स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर २५० पेक्षा अधिक पुरस्काराने ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशनला गौरविण्यात आले आहे. प्रत्येक सण, उत्सव, प्रत्येक महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी, राजकारणातील प्रत्येक पक्षाचे नेते यांची वाढदिवस झाडे लावून साजरा करण्यात आले. ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशनच्या कार्याला आज २१०० दिवस पुर्ण होत आहेत. यापुढेही ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशनचे काम अविरतपणे सुरुच राहिल, असा संकल्प ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आला आहे.